विक्रमावर लक्ष्य नाही, फक्त खेळत राहायचेय!

सध्या सुपर फॉर्मात असलेला इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ज्यो रूटचे लक्ष्य सचिन तेंडुलकरच्या 15,921 धावांवर नाहीय. फक्त खेळात सुधारणा करत संघासाठी योगदान देत राहायचे, खेळत राहायचेय, अशी भावना त्याने बोलून दाखवलीय. चौथ्या कसोटीत रूटने विक्रमी 38 वे शतक करताना रिकी पॉण्टिंगचा 13,378 धावांचा विक्रम मोडला आणि आपल्या धावांचा आकडा 13,409 धावांवर नेला. आता त्याच्यापुढे फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकरच आहे. या विक्रमी खेळीनंतर एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रूट म्हणाला, ‘सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या महान खेळाडूपैकी एक आहे. त्याने ज्या प्रकारचा दबाव झेलला आणि ज्याप्रकारे यश संपादन केले, ते अविश्वसनीय आहे. मी सचिनचा खेळ पाहूनच मोठा झालोय.  त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण मी त्यांच्या विक्रमांच्या मागे नाहीय. ते माझे लक्ष्यही नाही. आपण जेव्हा चांगले खेळतो तेव्हा अशा गोष्टी आपोआप घडतात,’ असेही रूट म्हणाला.

सचिनबरोबर खेळणे अद्भुत

रूटने आपल्या क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीचा एक संस्मरणीय प्रसंगही शेअर करताना सांगितले की, ‘2012 मध्ये नागपूर कसोटीत माधा पदार्पणाचा सामना झाला होता आणि हीच मालिका सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यांपैकी एक होती. तो क्षण माझ्यासाठी खास होता. ज्या खेळाडूला आपण लहानपणी आदर्श मानत होतो, त्याच्याविरुद्धच खेळण्याची संधी मिळणं, हे खरंच अद्भुत होतं. सचिन मैदानात उतरला की संपूर्ण स्टेडियममध्ये टाळय़ांचा कडकडाट व्हायचा. हे दृश्य पाहून त्याच्या महानतेची जाणीव व्हायची,’ असेही रूट आवर्जून म्हणाला.

Comments are closed.