महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार बिनविरोध

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची रविवारी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱयांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या आखाडय़ातही त्यांनी बाजी मारली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही राज्यातील सर्वांत जुनी संघटना आहे. दोन वर्षांपूर्वी संघटनेची मान्यता आणि राजकारणाच्या आखाडय़ात अडकलेल्या या संघटनेची निवडणूक आणि वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ खरा की महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद वैध याचा वाद थेट कोर्टाच्या दारात पोचला होता. अखेर पुण्यात वारजे येथे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बोर्डाची निवडणूक झाली. यामध्ये आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
आमदार रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर सलग तीन वेळा एमपीएल यशस्वीपणे भरवून राज्याच्या कानाकोपऱयातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच गेल्या वर्षी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत वाद झाल्याने आणि या स्पर्धेच्या एकूणच वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आमदार रोहित पवार यांनी ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’च्या मान्यतेने कर्जत येथे 66 वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या भरवली होती. आता तर त्यांनी कुस्तीगीर परिषदेच्या संघटनेच्या सर्वोच्च पदावर मजल मारली आहे.
‘कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील मैदानी खेळ असून या कुस्तीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी आणि राज्यातील गुणी व होतकरू मल्लांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पवार साहेबांनी या संघटनेत केलेलं काम माझ्यापुढं दीपस्तंभाप्रमाणे असून यापुढेही आम्हाला सर्वांनाच त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या निवडणुकीत बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघांचे मनापासून आभार.’ – रोहित पवार
Comments are closed.