Night Shift: रात्रपाळीमुळे वाढतोय प्रजनन क्षमतेचा धोका
आजच्या धकाधकीच्या आणि सतत बदलणाऱ्या जीवनशैलीत रात्रपाळी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. उद्योग, आयटी, आरोग्य आणि सेवा क्षेत्रात रात्री काम करणे ही अनेकांची नित्याची बाब झाली आहे. मात्र, या रात्रपाळ्यांचा परिणाम केवळ झोपेवरच नाही, तर आपल्या संपूर्ण शरीरावर विशेषतः प्रजनन क्षमतेवर होतो, हे आता संशोधनातून समोर आले आहे. (night shift infertility risk information in marathi)
प्रजननावर होणारे परिणाम
रात्रपाळीमुळे शरीरातील नैसर्गिक झोपेचे चक्र बिघडते. यामुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्येत घट होते, तर महिलांमध्ये ओव्हुलेशन प्रक्रियेवर परिणाम होतो. परिणामी, नैसर्गिक गर्भधारणा होणे कठीण ठरते.
मेलाटोनिन नावाचा हार्मोन, जो झोपेसाठी महत्त्वाचा असतो, त्याचे उत्पादन रात्री कमी होते. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि शरीरातील कोर्टिसोलची (तणाव संप्रेरक) पातळी वाढते. या हार्मोनल बदलांचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो.
अनेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे आणि त्यामध्ये रात्रपाळी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अनियमित मासिक पाळी, थकवा, कामेच्छा कमी होणे, झोप न लागणे, नैराश्य ही लक्षणे सामान्य असली तरी ती गंभीर आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. सुदैवाने, वेळेत निदान आणि उपचार केल्यास अनेक जोडप्यांना आययूआय, आयव्हीएफ किंवा इतर सहाय्यक प्रजनन उपचारांद्वारे पालकत्व मिळवणे शक्य होते. मात्र यासाठी लवकर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
रात्रपाळी करणाऱ्यांसाठी सजगता गरजेची
जे व्यक्ती रात्रपाळी करतात त्यांनी स्वतःच्या झोपेच्या वेळांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, पोषणयुक्त आहार आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे हार्मोनल असंतुलनाचे परिणाम काही प्रमाणात कमी करता येतात. वैद्यकीय सल्ला घेतल्यास योग्य उपचार मार्ग निवडता येतो.
काम महत्त्वाचे आहेच, पण आरोग्य त्याहून महत्त्वाचे आहे. रात्रपाळी ही आजच्या काळाची गरज असली तरी, ती आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रणालीला विरोध करणारी बाब आहे. त्यामुळे सजग राहून वेळेवर उपाय करणे हेच निरोगी आयुष्य आणि पालकत्वासाठी पहिलं पाऊल ठरेल.
Comments are closed.