पाचव्या कसोटीमधून बाहेर होणार 'हा' गोलंदाज, माजी खेळाडूचं धक्कादायक विधान!

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक आश्चर्यकारक विधान केले आहे. त्याचे मत आहे की आर्चरला पाचव्या कसोटी सामन्यातून वगळले पाहिजे. यामागे त्यांनी एक मोठे कारण सांगितले आहे.

गेल्या काही वर्षांपासून दुखापतीमुळे आर्चर बराच काळ संघाबाहेर आहे. याच कारणास्तव, तो 4 वर्षांनी कसोटी क्रिकेट खेळताना दिसला. सध्याच्या मालिकेत आतापर्यंत आर्चरने चार डावांमध्ये 88.3 षटके टाकली आहेत. या काळात तो फक्त 9 विकेट घेऊ शकला आहे. जर आर्चर पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला तर इंग्लंडकडे त्याच्या जागी गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत आणि यावर्षी अ‍ॅशेस देखील खेळवल्या जाणार आहेत. या कारणास्तव, स्टुअर्ट ब्रॉड आर्चरला विश्रांती देऊ इच्छितो आणि अ‍ॅशेस मालिकेसाठी त्याला तंदुरुस्त ठेवू इच्छितो.

स्टुअर्ट ब्रॉडने जोफ्रा आर्चरला ओव्हलमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचं म्हणणं आहे की आर्चरला पुन्हा दुखापत होऊ शकते. तो चार वर्षांनंतर परत आलाय आणि सतत गोलंदाजी केल्याने धोका वाढतो. ब्रॉडने सांगितलं की गस अ‍ॅटकिन्सनला संधी द्यावी. अ‍ॅटकिन्सनवर अजून फार ताण नाही, पण त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याला अजून मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही.

ओव्हल येथे होणाऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या संघात जेमी ओव्हरटन या नवीन खेळाडूचा समावेश केला आहे. आता पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लिश संघ कोणत्या संयोजनासह मैदानात उतरेल आणि कोणत्या खेळाडूंना अंतिम अकरामध्ये संधी मिळेल हे पाहणे बाकी आहे.

Comments are closed.