ओव्हल टेस्ट रंगतदार वळणावर; यशस्वीच्या फलंदाजीवर भारताची पुढील रणनीती ठरेल निर्णायक

लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीच्या खेळाने रंगतदार वळण घेतलं आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 75 धावा केल्या असून भारताकडे 52 धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल 51 आणि नाईटवॉचमन आकाश दीप 4 धावांवर नाबाद आहेत.

पहिल्या डावात भारताने 224 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने 247 धावा करत 23 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी एकूण 15 गडी बाद झाले. भारताने दिवसभरात फक्त 20 धावा करत उरलेले 4 गडी गमावले. इंग्लंडच्या गस ऍटकिंसनने 5 बळी घेतले. त्यानंतर इंग्लंडने दमदार सुरुवात करत 92 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. मात्र नंतरचा कोसळलेला डाव भारतीय गोलंदाजांनी सांभाळला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. क्रिस वोक्स मैदानात न आल्याने इंग्लंडचा डाव 247/9 वर संपला.

भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुल (7) आणि साई सुदर्शन (11) लवकर बाद झाले. पण यशस्वी जैस्वालने संयमाने खेळ करत भारताला सावरलं. तिसऱ्या दिवशीचा पहिला सेशन निर्णायक ठरणार आहे. पिच अजूनही गोलंदाजांसाठी अनुकूल आहे, त्यामुळे भारतीय फलंदाजांनी संयमी आणि शिस्तबद्ध खेळ करणं गरजेचं आहे. जर भारत 250 धावांचं लक्ष्य इंग्लंडसमोर ठेऊ शकला, तर सामना भारताच्या बाजूने वळू शकतो. यासाठी शुभमन गिल, करुण नायर आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Comments are closed.