कमर्शियल सिलेंडर्स स्वस्त 33.50

घरगुती सिलिंडरच्या दरात बदल नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या किमतीत 33.50 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. नवीन दर शुक्रवार, 1 ऑगस्टपासूनच लागू झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा सिलिंडर अजूनही 853 रुपयांना उपलब्ध आहे. दुसरीकडे, व्यावसायिक विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाची (एटीएफ) किंमत 2677.88 रुपयांपर्यंत वाढल्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो.

दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,631.50 रुपयांवर तर मुंबईत हा दर 1,582.50 रुपयांवर आला आहे. या दरकपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, घरगुती ग्राहकांना यावेळीही दिलासा मिळालेला नाही. एप्रिल 2025 मध्ये घरगुती सिलिंडरच्या  किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. सध्या घरगुती सिलिंडर दिल्लीत 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध आहे.

Comments are closed.