टेस्टमध्ये सर्वाधिक 5 बळी घेणारे गोलंदाज कोण? किती भारतीयांचा आहे समावेश?जाणून घ्या सविस्तर

टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात पाच बळी घेणे हे कोणत्याही गोलंदाजाच्या कारकिर्दीतील एक मोठं यश मानलं जातं. यामुळे केवळ सामन्याच्या निकालावर परिणाम होत नाही, तर त्या खेळाडूच्या गोलंदाजीतील कौशल्याचीही साक्ष मिळते. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात अनेक दिग्गज गोलंदाजांनी हे यश अनेक वेळा मिळवलं आहे. पण काही असेही खेळाडू आहेत, ज्यांनी या यादीत आपलं स्थान अगदी शीर्षस्थानी कायम राखलं आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा खेळाडूंबद्दल, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

1992 ते 2010 या कालावधीत श्रीलंकेकडून खेळलेल्या मुथैया मुरलीधरनने 133 टेस्ट सामन्यांच्या 230 डावांमध्ये गोलंदाजी करत एकूण 800 बळी टिपले आहेत. या दरम्यान त्यांनी 67 वेळा एका डावात पाच बळी घेतले, हा विक्रम आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाही. त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा 9 बाद 51 धावा असा आहे. एवढच नाही तर त्यांनी 22 वेळा एका सामन्यात 10 बळी घेण्याचाही पराक्रम केला आहे. मुरलीधरनने 22.72 च्या सरासरीने आणि 2.47 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे.

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने अलीकडेच टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. 2011 साली त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि आतापर्यंत त्यांनी 37 वेळा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी 106 टेस्ट सामन्यांच्या 200 डावांमध्ये एकूण 537 बळी टिपले आहेत. अश्विनचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 59 धावांमध्ये 7 बळी असा आहे. त्यांच्या गोलंदाजीची सरासरी 24.00 असून स्ट्राइक रेट 50.73 आहे. याशिवाय त्यांनी 8 वेळा एका सामन्यात 10 बळी घेण्याचा विक्रमही केला आहे.

ऑस्ट्रेलियाचे महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांनीही टेस्ट क्रिकेटमध्ये 37 वेळा एका डावात पाच बळी घेतले आहेत. त्यांनी 145 टेस्ट सामन्यांच्या 273 डावांमध्ये एकूण 708 बळी टिपले असून, त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा 8 बळी आणि 71 धावा असा आहे. त्यांच्या गोलंदाजीची सरासरी 25.41 इतकी होती आणि त्यांनी 10 वेळा एका सामन्यात 10 बळी घेण्याचाही पराक्रम केला होता.

न्यूझीलंडचे जलदगती गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी हे यश अगदी कमी सामन्यांमध्ये मिळवलं होतं. त्यांनी केवळ 86 टेस्ट सामन्यांमध्येच 36 वेळा एका डावात पाच बळी घेतले आहेत. एकूण 431 बळी त्यांनी घेतले असून, त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा 9 बाद 52 असा आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी 9 वेळा एका सामन्यात 10 बळी घेण्याचाही पराक्रम केला आहे.

या यादीत आणखी एका भारतीय दिग्गजाचा समावेश आहे. भारताचे माजी महान स्पिनर अनिल कुंबळे यांनी 132 टेस्ट सामन्यांच्या 236 डावांमध्ये एकूण 619 बळी घेतले आहेत. त्यांनी 35 वेळा एका डावात पाच बळी आणि 8 वेळा एका सामन्यात 10 बळी घेत आपल्या कामगिरीची मोहोर या यादीत उमटवली आहे. त्यांचा सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा 74 धावा देऊन 10 बळी असा आहे, जो एका डावात सर्व 10 बळी घेण्याचा दुर्मिळ विक्रम देखील आहे.

Comments are closed.