अभिप्राय – अंतरंगाचा कॅलिडोस्कोप
>> शुभांगी दळवी
सुहास मळेकर यांचे ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ!’ हे पुस्तक म्हणजे हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेला अनुभवांचा खजिना आहे. मुंबईसारख्या महानगरात माणसाने रोजच्या धकाधकीत स्वतला जपायचं असेल, तर मोकळ्या मनाने हसण्याची सवय लागली पाहिजे, हे मळेकर यांच्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते. गावखेडं, फिर मिलेंगे, हॅलो वहिनी, सहधर्मचारिणी, कपडे मायने नहीं रखते असे काही लेख पुस्तक वाचून संपल्यावरही मनात रुंजी घालतात.
लेखकाने आपल्या आयुष्यातील छोटय़ा छोटय़ा प्रसंगांना वास्तव शैलीत उलगडले आहे. साध्या रोजच्या घडामोडी, सामान्य माणसांचे स्वभाव, प्रवासातल्या गमतीजमती यावर भाष्य करताना मळेकर यांची लेखनशैली प्रेक्षकाला आपलंसं करते. कोणताही कृत्रिम टोन न आणता अगदी संवादात्मक आणि खुसखुशीत भाषेत हे लेख लिहिलेले आहेत.
‘एक राऊंड मारून येऊ’ या शीर्षकातून आनंदी, सकारात्मक जगण्याचा अनुभव घेऊ, असे आर्जव पुस्तकाच्या निमित्ताने लेखक वाचकांना करतात आणि वास्तव जीवनाचे सार थेट उलगडतात.
सुहास मळेकर यांचे ‘अवतीभवती’ हे सदर ‘सामना’मधून प्रसिद्ध होत होते. त्याचेच पुढे पुस्तकात रूपांतर झाले. ‘जाऊ दे, मला काय त्याचे’, ‘म्हातारपण तुम्हाला उघडं पाडतं’, ‘बदलाव’, ‘फॅशन’, ‘आई’ असे अनेक लेख मनाचा ठाव घेणारे आहेत. या पुस्तकात लेखकाने आपल्याभोवती घडणाऱया अगदी सहज, सामान्य वाटणाऱया गोष्टींमध्येही हास्य आणि उपहास शोधून वाचकांसमोर उभ्या केल्या आहेत. अगदी साधे प्रसंग जसे बस प्रवास, लोकल ट्रेनमधील माणसे, रस्त्यावरचे विक्रेते, नातेवाईकांच्या खोडय़ा हे सर्व मळेकर यांच्या खास मिश्कील नजरेतून वेगळ्या ढंगात समोर येतात.
रोजच्या जगण्यातल्या छोटय़ा छोटय़ा निरीक्षणांमधून मोठं तत्त्वज्ञान मांडतानाच चेहऱयावर हसू आणणे ही लेखन कला अतिशय कौतुकास्पद आहे. भाषेतील सहजता आणि वाचकांशी थेट संवाद अशी काही वैशिष्टय़े सांगता येतील. हे लेख म्हणजे दैनंदिन आयुष्याचा हलकाफुलका ब्रेकच! ‘अवतीभवती’ या सदरातल्या गोष्टी म्हणजे जगण्याच्या गर्दीतले आनंदाचे काही क्षण. विनोद, मिश्कीलपणा आणि जीवनातली सहजता याची मेजवानी हवी असेल तसेच मानवी आयुष्याच्या अंतरंगांचा कॅलिडोस्कोप अनुभवायचा असेल तर सुहास मळेकर यांची पुस्तके नक्की वाचायला हवीत.
वॉक बस… एक राऊंड मारून येऊ!
अवतीभवती सदरच्या गोष्टी
लेखक: सुहास मळेकर ? पृष्ठे ः 144
किंमत ः 250 रुपये? प्रकाशक शोक प्रकाशन
Comments are closed.