उत्तराखंडमध्ये भूस्खलन

चमोलीत जलविद्युत प्रकल्पस्थळी डोंगर कोसळला

वृत्तसंस्था/ देहराडून

उत्तराखंडमधील चमोली जिह्यातील हेलांगजवळील टीएचडीसीच्या विष्णुगड जलविद्युत प्रकल्पस्थळी शनिवारी भूस्खलन होऊन बारा कामगार जखमी झाले. भूस्खलनाच्या वेळी प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे 300 कामगार काम करत होते, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी दिली. जोरदार पावसानंतर डोंगरावरून दगड खाली येऊ लागल्यानंतर कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. तरीही आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली, तर चार गंभीर जखमी झाले. सर्व जखमी कामगारांना पिपलकोटी येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मान्सूनच्या पावसाने पर्वतांवर आपत्ती आणली आहे. उत्तराखंडमधील चमोली येथील विष्णुगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या धरणाच्या जागेवर डोंगराचा मोठा भाग तुटून पडला. या आपत्तीवेळी त्याठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू होते. उत्तराखंडप्रमाणेच सततच्या पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मनाली येथे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. चंदीगड-मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग (एनएच-3) आणि सोलंगनाला ते अटल बोगदा हा रस्ता बंद आहे. गेल्या 3 दिवसांत मुसळधार पावसामुळे एकूण 289 रस्ते प्रभावित झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री रियासी जिह्यात एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या गाडीला भूस्खलनाचा धक्का बसला. त्यांच्या गाडीवर अचानक दगड पडला. या अपघातात एसडीएम आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीसह 6 जण जखमी झाले. हवामान खात्याने शनिवारी आसाम, मेघालय, सिक्कीम, पश्चिम बंगालमध्ये पावसासाठी रेड अलर्ट आणि बिहार, अरुणाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्लीसह 19 राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Comments are closed.