मुद्रा – दिव्य झळाळी
>> मंगेश वरावडेकर
बुद्धिबळाच्या पटावर चालींमध्ये सुसाट वेगाने धावणारी दिव्या देशमुख. बुद्धिबळाच्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये पहिली येत दिव्याने ‘क्वीन ऑफ चेस’चा मान पटकाविला आहे.
दिव्या देशमुख… नाव तर ऐकलंच असेल. गेल्या आठवडाभरात हे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाच्या मुखी आलंय. त्याआधी कुणाच्या तरी शेजारच्या दहावीच्या हुशार मुलीची आठवण झाली तर चूक नका मानू. दिव्याकडे पाहिल्यावर कुणालाही अशी आठवण येऊ शकते. पण ही मुलगी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिली नाही आलीय. ती बुद्धिबळाच्या महिलांच्या वर्ल्डकपमध्ये पहिली आलीय. ती शाळेतल्या किंवा कॉलेजातल्या परीक्षेत डोकं चालवत नव्हती. तिचं डोकं बुद्धिबळाच्या पटावर चालींमध्ये सुसाट वेगाने धावायचं. ते डोकं चालवूनच ती आता बुद्धिबळाची राणी झाली. महाराणी झाली.
जॉर्जियाच्या बाटुमी शहरात सुरू झालेल्या शह आणि मातच्या खेळात अनेक ग्रॅण्डमास्टर खेळत होत्या. यात दिव्या खूपच मागे होती. पण ती आपल्या खेळाने इतक्या वेगात पुढे आली की ती आता देशाचा अभिमान झालीय. स्पर्धेआधी ती नावारुपाला येत होती. पण या वर्ल्ड कपमध्ये तिचा खेळ भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारा ठरला. या स्पर्धेतील चिनी आक्रमण तिने असे परतावून लावले की अवघं जग तिच्या खेळावर आणि आत्मविश्वासावर फिदा झालं. तिने सर्वप्रथम अंतिम फेरीत धडक मारली तेव्हा सर्वांचेच डोळे पांढरे पडले होते. हे सारंकाही फ्लूक नव्हतं. हे तिने जगज्जेते पदाच्या संघर्षमय लढतीत दाखवून दिलेय. जेव्हा तिची गाठ कोनेरू हम्पीशी पडणार, हे निश्चित झाले तेव्हाच हिंदुस्थानने बुद्धिबळाचं जग जिंकलं होतं.
आजवर कधीही जगज्जेते पदाच्या लढतीत एकाच देशाच्या दोन्ही खेळाडू नव्हत्या. हा इतिहास होता. तो दिव्याने रचला होता. तो तिने घडवला होता. जगज्जेते पद आपणच जिंकणार, हे आधीच निश्चित झाल्यामुळे या अंतिम लढतीची उत्सुकता अन्य देशांना नव्हती. पण हम्पी आणि दिव्याने दाखवून दिले की प्रतिस्पर्धी हा शेवटी प्रतिस्पर्धीच असतो. मग तो आपल्याच देशाचा असला तरी त्याच्याशी लढावंच लागतं. युद्धात प्रतिस्पर्धी कोण आहे, हे कधीच पाहिलं जात नाही. हे या अंतिम लढतीतही दिसलं. जगज्जेते पदाची भूक दोघींना होती. पण विजयाचा घास दिव्याने हम्पीकडून हिरावून घेतला. त्यानंतर जे काही घडतंय ते अद्भुत आणि दिव्यच आहे.
बुद्धिबळाच्या महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी हम्पीच्या तोंडात एक डायलॉग होता आणि असायलाच हवा. कारण तिचा अनुभव आणि तिचा खेळ पाहता दिव्या खूपच लहान आणि अननुभवी होती. त्यामुळे हम्पी तेव्हा नक्कीच म्हणाली असेल, बच्ची, तुम जिस स्कूल में पडती हो, उस स्कूल के हम हेडमास्टर है. हा डायलॉग हम्पीच्या तोंडात शोभलाही असता. कारण हम्पी 2001 साली हिंदुस्थानची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर झाली होती. तेव्हा दिव्या जगातही नव्हती. बुद्धिबळात महिलांना मानसिक बळ आणि स्फूर्ती हम्पीच्या खेळानेच दिली होती. त्याच हम्पीला महाराष्ट्राच्या लेकीने अर्थातच दिव्या देशमुखने चोख प्रत्युत्तर दिले. तू असशील हेडमास्तर, पण मी आता त्या शाळेची संचालिका आहे. आपली दिव्या आता बुद्धिबळाची संचालिका नव्हे तर महाराणी झालीय.
दिव्याचे नाव गेल्या काही महिन्यांत नावारुपाला आले होते. तिला लोक हळूहळू ओळखू लागले होते. पण आता स्थिती वेगळीय. नागपूरच्या संत्र्यांची चव जशी सर्वांच्या जिभेवर सदैव रेंगाळत असते. तसेच दिव्याचे नाव जगात प्रत्येकाच्या मुखी असेल. दिव्या आता अवघ्या 19 वर्षांचीच आहे. पण या छोटय़ाशा वयात तिने जग जिंकलंय. बुद्धिबळाची जगज्जेती होण्याआधी तिने 10 आणि 12 वर्षे वयोगटात अनेक शिखरं गाठली होती. तिच्या यशाचा आलेख पाहिल्यावर वाटतं ही कधी शाळेत तरी गेली होती ना… की ती अभ्यासही डावपेचासारखे करायची? अनेकांना तिच्या शिक्षणाबद्दल शंका असू शकते. पण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. हे खेळाडू आपल्या शिक्षणातही टॉपरच असतात. हे बहुधा अनेकांना माहीत नसावं. तिने आजवर अनेकांना आपल्या चालींनी शब्दहीन केलेय. जॉर्जियात तर तिच्या चालींनी अवघ्या जगाची नजर खेचली. तेव्हाच तिने संकेत दिले होते की बुद्धिबळाच्या एव्हरेस्टवर बर्फ नव्हे तर तिरंगा फडकणार. दिव्याच्या चालींमध्ये आत्मविश्वास होता, पण या विजयाचं स्वप्न तिनं आपल्या डोळ्यात कायम जपलं होतं. विजयानंतर तिनं आपल्या यशाचे अनेक भागीदार आणि आधारस्तंभ असल्याचे सांगितले. माझं हे यश वैयक्तिक नसल्याचे ती प्रामाणिकपणे म्हणाली.
एकाग्रता, जिद्द आणि चिकाटी अंगी बाणवल्याशिवाय काहीच मिळत नाही. मोठी स्वप्नं पाहावीच लागतात. त्यांच्या मागे वेडय़ासारखं पळावं लागतं. झगडावं लागतं. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मेहनतीला पर्याय असूच शकत नाही. दिव्याने जे यश मिळवलंय ते टिकवण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल. जितकं एव्हरेस्ट सर करणं कठीण असतं, त्यापेक्षा कैकपटीने कठीण त्यावर टिकून राहणं असतं. काही दिवसांपूर्वी बुद्धिबळाची राजकुमारी असलेली दिव्या आता राणी नाही तर महाराणी झालीय. तिच्या या यशामुळे हिंदुस्थानात मोठय़ा संख्येने मुली बुद्धिबळाच्या पटावर आपले कौशल्य दाखवायला उतरतील, हे कुणीही सांगू शकतो. खरं सांगायचं तर तिने बुद्धिबळाला दिव्य झळाळी दिलीय. आज तिचं नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय… जगज्जेती दिव्या देशमुख!
Comments are closed.