'सिंदूर' च्या माध्यमातून सूड घेण्याचे वचन पूर्ण झाले
पंतप्रधानांचे वक्तव्य : वाराणसी दौऱ्यात ‘टॅरिफ’वरही भाष्य : कृषी योजनांसह विकास प्रकल्पांचे लोकार्पण
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यामुळे आपण बदला घेण्यासंबंधी दिलेले वचन पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपात देशातील जवळपास पावणेदहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी रुपये पाठवण्यात आले. तसेच अमेरिकेने भारतावर लादलेल्या 25 टक्के आयात शुल्कावर भाष्य करताना पंतप्रधानांनी ‘आम्ही फक्त तेच खरेदी आणि विक्री करू ज्याच्या निर्मितीत कोणत्याही भारतीयाने घाम गाळला आहे’ असे सांगत भारतीयांच्या घामाद्वारे तयार होणाऱ्या कोणत्याही वस्तू आदान-प्रदान करण्यास सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तब्बल 51 व्या वेळी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीला पोहोचले. यावेळी त्यांनी 2,183.45 कोटी रुपयांच्या 52 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचाही उल्लेख केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर आज मी पहिल्यांदाच काशीला आलो आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, 26 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबांचे, मुलांचे, मुलींचे दु:ख पाहून माझे हृदय खूप वेदनांनी भरलेले होते. त्याप्रसंगी मी बाबा विश्वनाथांना प्रार्थना करत होतो की त्यांनी सर्व पीडित कुटुंबांना हे दु:ख सहन करण्याची हिंमत द्यावी. त्याचप्रसंगी हा हल्ला घडवणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी मी कार्यरत झालो होतो. त्यातूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले. माझ्या मुलींच्या सिंदूरचा बदला घेण्याचे मी जे वचन दिले होते तेही या मोहिमेतून पूर्ण झाले आहे. महादेवाच्या आशीर्वादानेच हे काम फत्ते झाले आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश मी त्यांच्या चरणी समर्पित करतो. 140 कोटी देशवासीयांची एकता ही ऑपरेशन सिंदूरची ताकद बनली. ऑपरेशन सिंदूर हा सैनिकांच्या शौर्याचा क्षण होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.
शेतकऱ्यांवर ‘धन’वर्षाव
आज मला शेतकऱ्यांना वंदन करण्याची संधी मिळाली आहे. आज काशीमध्ये एक मोठा किसान उत्सव आयोजित केला जात आहे, असे सांगत पंतप्रधानांनी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या सरकारचा विकासाचा मंत्र सांगितला. ‘व्यक्ती जितकी मागास असेल तितकी त्याला जास्त प्राधान्य मिळेल’ असे ते म्हणाले. या महिन्यात केंद्र सरकारने प्रधानमंत्री धन धन्य कृषी योजना नावाची आणखी एक नवीन योजना मंजूर केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या योजनेवर 24 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. या माध्यमातून कृषी क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जारी
किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता पंतप्रधानांनी शनिवारी जारी केला. वाराणसीतील कार्यक्रमातूनच त्यांनी किसान सन्मान निधी देशातील शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यात 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आल्याचे जाहीर केले. काशीतून पैसे गेल्यावर ते आपोआप प्रसाद बनतात, असे ते म्हणाले. तसेच आज काशीमध्ये 2 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे आणि पायाभरणीही करण्यात आली आहे. बाबांच्या आशीर्वादाने काशीमध्ये विकासाचा अखंड प्रवाह गंगा आईसोबत पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रेष्ठ भारताची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी तामिळनाडूमध्ये होतो. मी तेथील 1 हजार वर्ष जुन्या ऐतिहासिक मंदिरात गेलो होतो. हे मंदिर देशाच्या शैव परंपरेचे एक प्राचीन केंद्र आहे. हे मंदिर आपल्या देशाचे महान आणि प्रसिद्ध राजा राजेंद्र चोल यांनी बांधले होते. राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतातून गंगेचे पाणी आणून उत्तरेला दक्षिणेला जोडले. एक हजार वर्षांपूर्वी, शिव आणि शैव परंपरेवरील त्यांच्या भक्तीद्वारे, राजेंद्र चोल यांनी एक भारत आणि श्रेष्ठ भारताची घोषणा केली. आज आम्ही आमच्या प्रयत्नांनी ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Comments are closed.