आरोग्य- ‘ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता राष्ट्रीय आरोग्य समस्या
>> डॉ.? अविनाश भोंडवे
आयसीएमआर आणि एम्स या भारतीय आरोग्य संस्थांच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार 70 टक्क्यांहून अधिक भारतीयांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचा निष्कर्ष देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य धोरणांसमोर आव्हान उभे करणारी ही समस्या निश्चितच गंभीर आहे.
भारतीयांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधानात सुमारे 70 ते 90 टक्के लोकांमध्ये `ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता आढळून आली आहे. ही समस्या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये समान स्वरूपात आढळून आली आहे.
आपल्या शरीरातली हाडे ही कॅल्शियममुळे मजबूत होत असतात. आपल्या आहारातून मिळणारे कॅल्शियम हे रक्तात उपलब्ध असलेल्या ‘ड‘ जीवनसत्त्वाच्या मदतीनेच हाडांमध्ये जमा होऊ शकते. शरीरात कॅल्शियम भरपूर असले आणि ‘ड‘ जीवनसत्त्व कमी असेल तर हाडे मजबूत होऊ शकत नाहीत. हाडांच्या मजबुतीप्रमाणेच स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठीही ‘ड‘ जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचा अभाव अनेक आजारांना कारणीभूत ठरतो.
‘ड‘ जीवनसत्त्व हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. डी2 – (अर्गोकॅल्सिफेरॉल) ः हे वनस्पतींमधून मिळते आणि डी3- (कोलकॅल्सिफेरॉल) ः हे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन त्वचेत तयार होते आणि प्राणिजन्य पदार्थांमधून मिळते.
‘ड‘ जीवनसत्त्वाचे स्रोत
सूर्यप्रकाशः त्वचेशी सूर्यप्रकाशाचा संपर्क आला की, ‘ड‘ जीवनसत्त्व तयार होते. सर्वांना मुक्त आणि मोफत असलेला हा ‘ड‘ जीवनसत्त्वाचा स्रोत सकाळी 9 ते 11च्या सूर्यप्रकाशात मिळतो. त्यासाठी मोकळ्या मैदानात फिरणे, पळणे किंवा मैदानी खेळ खेळणे आवश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस मोकळी मैदाने नष्ट होत चालली आहेत. तसेच सकाळी उठून खुल्या मैदानात व्यायाम करण्याची सवय बैठय़ा जीवनशैलीमुळे आजच्या तरुण पिढीत कमी होत चालली आहे. भारतीयांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव मोठय़ा प्रमाणात आढळण्याचे हे प्रमुख कारण आहे.
आहार स्रोत ः यामध्ये मासे, अंडय़ांचे पिवळ बलक, दूध, दही, बटाटा, मशरूम यांचा समावेश होतो. भारतामध्ये शाकाहारी व्यक्तींचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे मासे आणि अंडय़ांपासून मिळणारे ‘ड‘ जीवनसत्त्व त्यांना मिळत नाही. शाकाहारी आणि मांसाहारी, दोन्ही गटांमध्ये दूध घेणे उपयुक्त असते. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत प्रत्येक मुलाने आणि मुलीने किमान एक कप दूध घेणे आवश्यक असते, पण आर्थिकदृष्टय़ा कमकुवत समाजामधले दारिद्रय़ आणि उच्च उत्पन्न गटामधल्या लोकांचे दूध घेण्यामधील औदासीन्य यामुळे मुलांमध्ये दररोज दूध घेण्याची सवय लक्षणीयरीत्या कमी होत चालली आहे. भारतीयांच्या शरीरातील ‘ड‘ जीवनसत्त्वाच्या अभावाचे हेदेखील प्रमुख कारण आहे.
भारतात मांसाहारी पदार्थ म्हणजे चिकन, मटण, मासे हे खूप शिजवून किंवा तळून खाण्याचा प्रघात आहे. अंडीदेखील कच्ची खाण्याऐवजी ती उकडून किंवा त्यांचे ऑम्लेट करून खाल्ले जाते. या मांसाहारी पदार्थांमधील जीवनसत्त्वेच नव्हे, तर प्रथिनांसारखे आवश्यक अन्न घटक खूप शिजवल्यामुळे नष्ट होत असतात. यामुळे भारतातल्या शाकाहारी आणि मांसाहारी, वर्गांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाचे स्रोत मर्यादित राहतात.
पूरक आहार (सप्लिमेंट्स) ः डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावयाचे ‘ड‘ जीवनसत्त्व, गोळ्या, पातळ औषधे आणि इंजेक्शन्सच्या स्वरूपात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. ‘ड‘ जीवनसत्त्व हे पाण्यात विरघळत नाही. ते चरबीयुक्त द्रावात विरघळते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण तपासून त्याप्रमाणे ते किती दिवस घ्यायचे, हे डॉक्टरांना ठरवावे लागते. ही औषधे जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस घेतल्यामुळे रक्तातील ‘ड‘ जीवनसत्त्व अतिरिक्त प्रमाणात वाढले तर ‘हायपरव्हिटॅमिनोसिस डी’ ही गंभीर स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे ही औषधे घेताना प्रथम त्या व्यक्तीच्या रक्तातील ‘ड‘ जीवनसत्त्वांचे प्रमाण वेळोवेळी तपासावे लागते.
‘ड‘ जीवनसत्त्वाच्या अभावाची कारणे
सूर्यप्रकाशाचा अभाव ः शहरी जीवनशैलीमुळे लोक घराबाहेर कमी जातात. क्रीनवर जास्त वेळ घालवतात. बंद घरामध्ये कोंडून राहणे, बंद वाहनांमध्ये फिरणे, अंगभर कपडे वापरणे यामुळे सूर्यप्रकाशाचा फायदा मिळत नाही.
आहारातील कमतरता ः शाकाहारी आहारामध्ये ‘डी’ जीवनसत्त्वाचे स्रोत कमी प्रमाणात असतात.
त्वचेचा रंग ः गडद त्वचेतील मेलॅनिन पिगमेंटमुळे सूर्यप्रकाशापासून ‘ड‘ जीवनसत्त्व तयार होण्याचे प्रमाण कमी असते.
प्रदूषण ः हवामानातील धुके आणि प्रदूषणामुळे सूर्यप्रकाशाची अतिनील किरणे पृथ्वीवर येण्यास अडथळा निर्माण होतो.
गरोदर स्त्रिया ः भारतामध्ये स्त्रियांमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव मोठय़ा प्रमाणात आढळतो. त्यासाठी डॉक्टर दिवस राहिल्यापासून प्रसूतीनंतर बाळाचे स्तनपान चालू असेपर्यंत कॅल्शियम आणि ‘ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेण्यास सांगतात, परंतु सर्वसामान्यपणे गरोदर स्त्रिया, गरोदर अवस्थेतल्या सातव्या महिन्यापासून बाळंत होईपर्यंतच ही औषधे घेतात. साहजिकच या स्त्रियांमधले ‘ड‘ जीवनसत्त्व कमीच राहते. जन्मलेल्या बाळाला आईच्या शरीरातील ‘ड‘ जीवनसत्त्व, आईच्या पोटात असताना आणि स्तनपानातून अपुऱया प्रमाणात मिळते. परिणामत या नव्या पिढीमध्ये ‘ड‘ जीवनसत्त्वांचा अभाव मोठय़ा प्रमाणात वाढत चालला आहे.
‘ड‘ जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारे आजार
ऑस्टिओपोरोसिस (हाडांची क्षीणता) ः हाडे कमकुवत होऊन सहज फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. वृद्धापकाळातील स्त्रियांमध्ये हा आजार जास्त आढळतो.
रिकेट्स (बालकांमध्ये) ः हाडे मऊ होऊन वाकडी होतात. वाढत्या वयात पाय आणि हाडांच्या आकारात विकृती निर्माण होते. उंची वाढत नाही.
मस्क्युलर पेन (स्नायू दुखणे) ः स्नायू सतत दुखण्याचा त्रास होतो. शारीरिक क्षमता कमी होते.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे ः संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारखे आजार उद्भवण्याची शक्यता वाढते.
मार्गदर्शक तत्त्वे
सकाळच्या सूर्यप्रकाशात 20-30 मिनिटे व्यायाम करा.
आहारात अंडी, मासे, दूध आणि ‘ड‘ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश करा. z डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यकतेनुसार सप्लिमेंट्स घ्या.
शारीरिक व्यायाम आणि योगासने करून हाडे व स्नायू मजबूत ठेवा.
‘ड‘ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी जागरूकता आणि योग्य आहार व्यवस्था हाच उपाय आहे. तरुण पिढीने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास भविष्यातील गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.
(लेखक आयएमएचे माजी अध्यक्ष आहेत.)
Comments are closed.