रॉबर्ट वड्राचे त्रास वाढतात
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाची नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयाने शनिवारी काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि अन्य आरोपींना मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणी नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अलिकडेच या आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपींना याची प्रत उपलब्ध करविण्याचा निर्देश राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने ईडीला दिला आहे. आरोपपत्रात या तिघांसोबत 8 कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
रॉबर्ट वड्रा यांच्यावर 58 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गुरुग्राम भूमी व्यवहारात ‘मनी लॉन्ड्रिंग’ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपींमध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीज आणि याचे संचालक सत्यानंद याजी तसेच के.एस. विर्कही सामील आहेत. गांधी परिवाराच्या विरोधात तीन महिन्यांमध्ये दाखल हे दुसरे आरोपपत्र आहे. यापूर्वी ईडीने 17 एप्रिल रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
रॉबर्ट वड्रा यांच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. हरियाणा आणि राजस्थानातील जमिनींच्या व्यवहारांशी संबंधित चौकशी सुरू आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना आणि केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकार असताना हे जमीन घोटाळे झाले होते. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून वड्रा यांना अनेक विशेष सवलीत मिळाल्या होत्या. याचबरोबर वड्रा यांच्या विरोधात फरार शस्त्र दलाल संजय भंडारीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीही चौकशी होत आहे. वड्रा यांना अनेक शस्त्रव्यवहारांच्या बदल्यात भंडारीने लंडन आणि दुबईमध्ये अनेक मालमत्ता खरेदी करून दिल्याचा आरोप आहे.
ईडीने वड्रा आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची 37 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई गुरुग्राम पोलिसांकडून 2018 साली एक एफआयआर नोंदविण्यात आल्यावर सुरू करण्यात आली. या जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप होता. ईडीने याप्रकरणी वड्रा आणि त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 43 संपत्ती जप्त केल्या होत्या.
Comments are closed.