अक्क्लकोटमधील अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा; 49 गाळे हटविले, 41जणांनी स्वतःच अतिक्रमण काढले

अक्कलकोट नगरपालिकेने आज मोठय़ा बंदोबस्तामध्ये अतिक्रमणांवर हातोडा टाकला. 4 जेसीबी, 2 पोकलेन, 4 हायवा, 14 टॅक्टर, 90 कर्मचारी आणि 125 पोलीस, 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात बसस्थानकामागील अतिक्रमण गाळे हटविण्यात आले. या कारवाईमध्ये 40 गाळे हटविण्यात आले, तर 41 गाळेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. आजच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यापारी वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ज्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले, तेथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी नगरपालिका घेत असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. अक्कलकोट शहरात बहुधा प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. तहसीलदार विनायक मगर यांनीही अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्यासह 10 पोलीस अधिकारी तसेच 125 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बसस्थानकामागील अतिक्रमण केलेल्या 70 गाळेधारकांना नगरपालिकेने नोटीस दिली होती. हा वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात गेला. उच्च न्यायालयाने गाळेधारकांविरोधात आणि नगरपालिकेच्या बाजूने निर्णय आला. याबाबत नगरपालिकेने प्रसिद्धीकरण देऊन आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर हातोडा टाकला.

Comments are closed.