माणमधील माळीखोरा-पळशी रस्त्याची दुरवस्था

माण तालुक्यातील पळशीतील माळीखोरा ते पळशी रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत अवघड असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊनही प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
जून महिन्यात झालेल्या पावसामुळे गुडघाभर चिखलातून ग्रामस्थांना ये-जा करावी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मार्गावरील यादववस्ती शेजारील हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनास वारंवार विनंती केली होती; पण या रस्त्याचे काम कोणीही करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
माळीखोरा ते पळशी हा अंदाजे पाच कि.मी.चा रस्ता असून, जागोजागी खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा आहे की खड्डय़ात रस्ता, हेच कळत नाही. शेतमालाची वाहतूक करणे अवघड होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पळशी येथे विद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी याच मार्गावरून ये-जा करत असतात. पण रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांना रोज अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. जागोजागी खड्डे पडल्यामुळे सायकल चालवताना विद्यार्थांना कसरत करत जावे लागत आहे. तसेच माळीखोरा येथून पळशी येथे रेशनिंग व आठवडी बाजारासाठी नेहमीच ग्रामस्थांना जावे लागते. रस्ता खराब असल्याने या मार्गावरून प्रवास करताना दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत.
तलावाच्या गळतीचे पाणी रस्त्यावर
यादव वस्ती शेजारीच तलाव असल्याने या तलावाला गेल्या दहा वर्षांपासून गळती लागली आहे. हे गळतीचे पाणी याच रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र गुडघाभर चिखल असतो. त्यामुळे रस्ताच दिसत नसल्याने ग्रामस्थांना महादेवमार्गे मोठा वळसा मारून पळशीला जावे लागत आहे.
Comments are closed.