IND vs ENG: सर रवींद्र जडेजा होणं एवढ सोपं नाही! जाणून घ्या आकडेवारी

भारतीय संघाचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्यावर एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी मोठे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, मालिकेच्या शेवटी तो संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्वतःची जागा पक्की करण्यात यशस्वी ठरला. या मालिकेत जडेजाने फलंदाजीसह जबरदस्त कामगिरी केली. त्याचमुळे त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्लंडच्या भूमीवर जडेजाचा विक्रम पाहून काही चाहत्यांना तर विश्वासही बसणार नाही.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध चालू मालिकेत 5 सामन्यांत 10 डाव खेळले आहेत. या काळात त्याने 86 च्या शानदार सरासरीने 516 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 5 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. बेन स्टोक्सने मागील 17 टेस्ट सामन्यांमध्ये जितकी अर्धशतके केली आहेत, तितकीच अर्धशतके जडेजाने केवळ 5 सामन्यांत ठोकली आहेत. इंग्लंडमध्ये क्रमांक 6 किंवा त्याखालच्या स्थानावर फलंदाजी करताना कोणत्याही विदेशी फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आता जडेजाच्या नावावर आहेत. त्याने इंग्लिश भूमीवर टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 1131 धावा केल्या असून, त्याने दिग्गज क्लाइव्ह लॉयडच्या 1126 धावांचा विक्रम मोडला आहे.

इंग्लंडच्या भूमीवर क्रमांक 6 किंवा त्याखाली फलंदाजी करणाऱ्या विदेशी फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाच्या नावावर आता 10 अर्धशतकांची नोंद झाली आहे. यासह त्याने क्लाइव्ह लॉयडच्या 10 अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले, तर केवळ सचिन तेंडुलकरच 12 अर्धशकांसह जडेजाच्या पुढे आहेत. एका टेस्ट मालिकेत क्रमांक 6 किंवा त्याखालून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू म्हणूनही आता रवींद्र जडेजा पुढे आला आहे. जडेजाने या मालिकेत 516 धावा केल्या असून, त्याने वी. व्ही. एस. लक्ष्मणच्या 474 धावांचा विक्रम मोडला आहे.

Comments are closed.