डिविलियर्स आजही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा श्रेष्ठ

वर्ल्ड चॅम्पियन्स लीगच्या (डब्ल्यूसीएल) अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दमदार शतकी खेळी करत दक्षिण आप्रिकेला जगज्जेतेपद मिळवून दिल्यानंतर एबी डिविलियर्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या खेळाने भारावलेल्या वेगवान गोलंदाज डेल स्टेनने डिविलियर्स अजूनही आजच्या काळातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा सरस असल्याची स्तुतिसुमने उधळली आहेत.
डिविलियर्सने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं. मात्र डब्ल्यूसीएल 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाचं नेतृत्व करत त्याने शानदार खेळ दाखवत क्रिकेटप्रेमींच्या मनावर पुन्हा एकदा आपली छाप सोडली.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने विजयासाठी 196 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे आव्हान डिविलियर्सच्या 60 चेंडूंतील नाबाद 120 धावांच्या झंझावातमुळे आफ्रिकेने अवघ्या 16.5 षटकांतच 9 विकेट राखून सहज पार पाडले. या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. डिविलियर्सचा स्ट्राईक रेट जवळपास 200 च्या आसपास होता. या अविश्वसनीय कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आलं. त्याने दिग्गजांच्या या स्पर्धेत 6 सामन्यांत 143.67 च्या सरासरीने 431 धावा केल्या. यामध्ये तीन शतकी खेळींचा समावेश होता. त्यामुळे त्याला ‘मालिकावीर’ ही बहुमान देण्यात आला.
या वयातही डिविलियर्सची धमाकेदार फॉर्म आणि स्टायलिश फलंदाजी पाहून डेल स्टेनसह अनेक क्रिकेटप्रेमी थक्क झाले आहेत. निवृत्तीनंतरही क्रिकेटच्या रंगमंचावर ‘मिस्टर 360 डिग्री’चं वर्चस्व कायम आहे, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले आहे.
Comments are closed.