गुरुवारी इंडिया अलायन्स बैठक
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी विरोधी नेते एकवटणार : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विचारमंथन होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स) आघाडीची महत्त्वाची बैठक 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे. ही बैठक सायंकाळनंतर होणार असून त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली जाईल. या बैठकीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल गांधी यांनी अलीकडेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 70-80 जागांवर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सध्याच्या कार्यपद्धतीबाबत विविध पक्षांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असल्याचे समजते. यासोबतच बैठकीत अन्य मुद्देही उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामध्ये बिहारमध्ये सुरू असलेली विशेष सघन सुधारणा (एसआयआर) प्रक्रिया, महाराष्ट्रात बनावट मतदार जोडल्याचे आरोप, ऑपरेशन सिंदूर, भारत-अमेरिका व्यापार करार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतासंबंधीच्या वक्तव्यांचा समावेश आहे.
‘इंडिया’ आघाडीची यापूर्वीची शेवटची बैठक 19 जुलै रोजी व्हर्च्युअल पद्धतीने झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 24 हून अधिक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आता पुढील बैठकीत फारुख अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) यांनीही बैठकीला उपस्थित राहण्याची पुष्टी केली आहे. ते बिहारच्या एसआयआर प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी आग्रही आहेत.
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर आरोप
राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवत ‘भारताची निवडणूक व्यवस्था मृतावस्थेत आहे. लोकसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सुमारे 1.5 लाख बनावट मतदार सापडले आहेत. निवडणूक आयोग आता अस्तित्वात नाही.’ असे अनेक आरोप केले आहे. निवडणूक आयोगाच्या कारनाम्यांबाबत गेल्या सहा महिन्यांत केलेल्या सखोल चौकशीत अनेक बाबी उघड झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे
Comments are closed.