आता वयचोरांची खैर नाही, बीसीसीआय नेमणार बाह्य एजन्सी

क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वयचोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने आता मोठे पाऊल उचलत आहे. ही वयचोरी रोखण्यासाठी आणि खेळाडूंच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी ‘बीसीसीआय’ एका बाह्य एजन्सीची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे यापुढे वयचोरी करणाऱ्या क्रिकेटपटूंची काही खैर नसणार. बीसीसीआयने वय पडताळणी प्रक्रियेसाठी निविदा मागविल्या आहेत. याअंतर्गत पात्र संस्थेला क्रिकेटमधील वयचोरी रोखण्याचे काम दिले जाणार आहे.

ही एजन्सी ऑगस्टअखेरीस निवडली जाण्याची शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ दोन स्तरांवर वय पडताळणी करणार आहे. एक म्हणजे दस्ताऐवज व जन्म प्रमाणपत्रांची तपासणी आणि दुसरे म्हणजे अस्थी परीक्षण. ही चाचणी मुलांसाठी 16 वर्षांखालील आणि मुलींसाठी 15 वर्षांखालील स्पर्धांसाठी केली जाते.

‘बीसीसीआय’ने इच्छुक संस्थांसाठी स्पष्ट अटी ठरवल्या आहेत. निवड होणाऱ्या एजन्सीकडे किमान तीन वर्षांचा वय पडताळणीचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच केवळ शैक्षणिक संस्था किंवा भरती एजन्सीपुरते हे निकष मर्यादित नाहीत. इच्छुक संस्थांकडे हिंदुस्थानातील सर्व राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये भौतिक आणि डिजिटल स्वरूपात पडताळणी करण्याची क्षमता असावी.

‘बीसीसीआय’ वर्षभर जुलै-ऑगस्टदरम्यान वय पडताळणी मोहीम राबवते. या वर्षी ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कारण एजन्सीच्या नियुक्ती प्रक्रियेला जास्त वेळ लागू शकतो. सर्व राज्यांतील प्रत्येक वर्गातील केवळ 40-50 टक्केच खेळाडूंची वय पडताळणी चाचणी घेण्यात येते. त्यामुळे आता प्रत्येक खेळाडूची पारदर्शक पद्धतीने व काटेकोरपणे वय चाचणी करण्याचा निर्धार ‘बीसीसीआय’ने केला आहे.

Comments are closed.