उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार

संसदेचे वादळी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. 6, 7 आणि 8 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली मुक्कामी असतील. 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, तसेच संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या पक्ष कार्यालयालाही ते भेट देणार आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’, मतदार याद्यांमधील हेराफेरीवरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरल्याने राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेले असतानाच उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा होत असून या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांचा फोन, दिले बैठकीचे निमंत्रण
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी पह्नवरून चर्चा केली आणि गुरुवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी झालेली ऑनलाइन बैठक वगळता लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झालेली नाही. त्यामुळे गुरुवारची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत अधिवेशनातील पुढच्या रणनीतीसोबतच मतदार याद्यांचा घोळ, तसेच अन्य मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.
Comments are closed.