मिझोरममध्ये जप्त केलेल्या 350 कोटी रुपयांची औषधे

ट्रकमधून केली जात होती वाहतूक : एका आरोपीला अटक

वृत्तसंस्था/ आयझोल

मिझोरमची राजधानी आयझोलमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी 350 कोटी रुपयांच्या मूल्याचे मेथामफेटामाइन आणि हेरॉइन ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज नेटवर्कच्या विरोधात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर आयझोलनजीक एक अचूक अभियान राबविले. गुन्हे अन्वेषण विभाग आणि नार्कोटिक्स पोलिसांच्या संयुक्त पथकाने यात भाग घेतला होता. अभियानादरम्यान जेमाबाक आणि सेलिंग भागांदरम्यान धावत असलेल्या पिकअप ट्रकला रोखण्यात आले.

या ट्रकमधून मिथून नावाचा इसम प्रवास करत होता, ट्रकच्या झडतीदरम्यान लपविण्यात आलेल्या एका डब्यात पोलिसांना 20 किलोहून अधिक क्रिस्ट मेथामफेटामाइन मिळाले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 300 कोटी रुपये आहे. याचबरोबर साबणाच्या 128 डब्यांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले 1.6 किलो हेरॉइनही जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे 49.56 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रकचा चालक बी ललथाजुआला (45 वर्षे) होता, जो आयझोलच्या रिपब्लिक मुआल वेंग भागाचा रहिवासी आहे. आरोपीला घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. अमली पदार्थांची ही खेप सीमेपलिकडून आणली गेली होती असे पोलिसांच्या प्रारंभिक तपासात आढळून आले आहे. ईशान्येच्या मार्गे भारताच्या विविध हिस्स्यांमध्ये हे अमली पदार्थ पोहोचविले जाणार होते. पोलिसांनी हे अमली पदार्थ ताब्यात घेत आरोपीची कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्क अन् त्याच्या म्होरक्यांच्या शोधाला वेग देण्यात आला आहे.

Comments are closed.