रशिया टी -14 आरमाता टँक ऑफर करते

जगातील सर्वात शक्तिशाली रणगाडा : भारतात निर्मितीचा प्रस्ताव

वृत्तसंस्था/ मॉस्को

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत-रशिया मैत्री खूपत आहे. ट्रम्प हे रशियासोबत व्यापार केल्याप्रकरणी भारतावर निर्बंधांचे इशारे देत आहेत. याचदरम्यान भारत-रशिया संरक्षण भागीदारी वाढण्याची चिन्हे आहेत. रशियाने भारताला नव्या पिढीच्या रणगाड्यासाठी टी-14 आर्माटा पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारत स्वत:च्या जुन्या ठरणाऱ्या टी-72 रणगाड्यांच्या जागी नवे रणगाडे सामील करण्याचा विचार करत आहे. रशियाच्या ऑफरमध्ये मेक इन इंडियाच्या अंतर्गत भारतात देशांतर्गत निर्मिती सामील आहे. रशियन कंपनी यूरालवॅगनजावॉड  ने भारताला स्वत:चा सर्वात आधुनिक टी-14 आर्माटा पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

रशियन कंपनीने स्वत:च्या नेक्स्ट जनरेशन रणगाडा कार्यक्रमासाठी भारताच्या गरजेनुसार या रणगाड्याचे डिझाइन आणि विकास करण्याची ऑफर दिली आहे. याकरता रशियन कंपनीने भारताच्या संरक्षण कंपन्यांसोबत भागीदारीसाठी रुची दाखविली आहे. हा प्रस्ताव भारताच्या ‘मेक-आय’ प्रोक्योरमेंट कॅटगेरीनुसार रणनीतिक स्वरुपात तयार करण्यात आला असून याचा उद्देश भारताच्या स्वदेशी उत्पादनाला वाढविणे आहे. या योजनेच्या अंतर्गत भारत सरकार प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी 70 टक्के निधी पुरविणार असून यामुळे देशांतर्गत निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर जोर देण्यात येतो.

यूरालवगोनजावॉड कंपनीने भारतासोबत टी-90एस रणगाड्यांसाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार केला होता. याची निर्मिती आता भारतात टी-90 भीष्म नावाने केली जाते. टी-90एस रणगाड्यात सुमारे 83 टक्क्यांपेक्षा अधिक देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यात रणगाड्याच्या इंजिनचे पूर्ण स्थानिकीकरण सामील आहे. रशियन अधिकाऱ्यांनी आता टी-14 आर्माटा रणगाडा प्रकल्पाकरता भारतासोबत स्थानिक निर्मितीचा विचार मांडला आहे. टी-14 आर्मटा भारतीय सैन्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे.

टी-14 आर्मटाला जगातील सर्वात अत्याधुनिक रणगाड्यांपैकी एक मानले जाते. यात रिमोटने संचालित होणारे अनेक फंक्शन, क्रूसाठी आर्म्ड कॅप्सूल, अत्याधुनिक डिजिटल नियंत्रण प्रणाली आणि ‘अफगानिट’ नावाची सक्रीय सुरक्षा प्रणाली आहे. ही प्रणाली शत्रूच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यास सक्षम आहे. यामुळे टी-14 हा भारतासाठी एक प्रभावी पर्याय ठरतो.

टी-14 आर्मटा रणगाडा का प्रभावी?

-रणगाड्यात तीन ऑपरेटर सामावू शकतात, यामुळे त्यांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढते.

-हा रणगाडा शत्रूची रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs आणि आरपीजींना हवेतच नष्ट करू शकतो.

-यात मिलिमीटर-वेव रडार बसविण्यात आला असून तो 360 अंश सुरक्षा देतो.

-या रणगाड्यातून निर्देशित क्षेपणास्त्रsही डागता येऊ शकतात, ज्यांचा मारक पल्ला 8-10 किलोमीटरपर्यंत असू शकतो.

-टी-14 चा कमाल वेग 75-80 किलोमीटर प्रतितास असून याची 500 किलोमीटर रेंज आहे.

-या रणगाड्याचे वजन 55 टन असून याची किंमत 30-42 कोटी रुपयांदरम्यान आहे.

-भारतात याची निर्मिती झाल्यास याची किंमत कमीतकमी 10 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.

Comments are closed.