निवडणूक आयोगाविरूद्ध आरोप सुरू आहेत

राहुल गांधी यांच्यानंतर गौरव गोगोई, चिदंबरम आक्रमक : संसदेत पडसाद उमटणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोगावर गंभीर वक्तव्ये करत असतानाच आता पक्षातील अन्य नेत्यांनीही आरोपास्त्र डागले आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले. मतदार यादीतील दुरुस्तीबाबत संसदेत खुली चर्चा व्हावी अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ती टाळत असल्याचा दावा गोगोई यांनी केला. तसेच दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे म्हटले आहे.

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्ष आवाज उठवू शकतो. मागील आठवड्यात दोन्ही सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा झाल्यानंतर आता निवडणूक आयोगासंबंधीचा मुद्दा विरोधी पक्ष उपस्थित करू शकतात. बिहारमधील निवडणूक यादी फेरसर्वेक्षणाचा विषयही या माध्यमातून मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहील. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडूनही आता निवडणूक आयोगाच्या कामकाज आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी आसाम काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीपूर्वी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत. सरकार यावर चर्चेपासून का पळून जात आहे? गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या कोणत्याही अनियमितता लपवण्याचा हा प्रयत्न आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

निवडणूक आयोगाकडून अधिकारांचा गैरवापर : चिदंबरम

निवडणूक आयोग राज्यांचे निवडणूक स्वरूप आणि पद्धत बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असे स्पष्ट करतानाच याला राजकीय आणि कायदेशीररित्या प्रतिकार केला पाहिजे, असे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी म्हणाले. बिहारमधील मतदार पुनरावृत्ती प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक विचित्र होत चालली आहे. 65 लाख मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा धोका असताना, तामिळनाडूमध्ये 6.5 लाख लोक मतदार म्हणून जोडले गेल्याचे वृत्त चिंताजनक आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.