पबजी खेळायचा नाद अन् पिस्तुलचा खेळ अंगाशी आला, खरी बंदुकीची गोळी सुटली अन् ..

गुन्हे ठेवा: मोबाईलवर ‘पब्जी ’ खेळण्याच्या नाद आणि मित्रांसमोर स्टाईल मारण्याचा हव्यास एका तरुणाला चांगलाच अंगाशी आलाय. पबजी खेळता खेळता तरुणानं आपल्या जमलेल्या मित्रांना खरीखुरी पिस्तूल लोड करून दाखवली. पिस्तूल लोड अनलोड करताना अचानक सुटली गोळी  आणि गोळीबारात ती मित्राच्या पायात घुसली अन तरुण गंभीर जखमी झालाय. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील उत्तमनगर भागात रविवारी (3 ऑगस्ट) रात्री उशिरा घडलाय. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय.

नेमकं घडलं काय?

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या पाच मित्रांचा ग्रुप रात्री एकत्र जमून ‘पबजी’ हा मोबाईल गेम खेळत होता. याचवेळी यातील एक तरुण त्याच्याकडे असलेलं पिस्तूल इतर मित्रांना दाखवू लागला. साधारण रात्री 1.30 च्या सुमारास, त्याने ते पिस्तूल लोड आणि अनलोड करत असताना अचानक पिस्तुलातून गोळी सुटली. अत्यंत जवळ बसलेले असल्यामुळे ही गोळी थेट समोर बसलेल्या मित्राच्या पायाच्या नडगीतून आरपार गेली. गोळी लागलेला तरुण तातडीने जखमी झाला. गोळीबार झाल्याचं लक्षात आल्यानंतर या पाचही तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना ही घटना कळू नये म्हणून त्यांनी बनाव करण्याचा निर्णय घेतला.

घटना कळू नये म्हणून केला बनाव

जखमी तरुणाने पोलिसांना फोन करून त्याच्यावर अनोळखी व्यक्तीने गोळीबार केल्याची खोटी माहिती दिली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा त्यांच्या वागण्यात आणि उत्तरांत तफावत आढळली. संशय बळावल्यावर पोलिसांनी या तरुणांना खाक्या दाखवताच त्यांनी अखेर खरी घटना उघड केली.पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं असून, ही शस्त्र कुठून आणली, याचा तपास सुरू आहे. या पाचही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. गोळी लागलेला तरुण सध्या उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात तरुणांमध्ये वाढत असलेला बेजबाबदार शस्त्रप्रेम आणि  व्हिडीओ गेम्सचा प्रभाव उघड झाला आहे. फक्त खेळ म्हणून सुरुवात झालेल्या प्रसंगाचा शेवट रुग्णालयात झालाय.

आणखी वाचा

Comments are closed.