IND vs ENG: जिद्दीचं दुसरं नाव डीएसपी सिराज! इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटचा सरताज!

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात झालेल्या 5 सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson Tendulkar Trophy) समारोप झाला आहे. टीम इंडियाने (Team india) ही मालिका 2-2 अशा बरोबरीत संपवली. या मालिकेत मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) चेंडूने केलेलं प्रदर्शन अत्यंत कौतुकास्पद ठरलं. तो मालिकेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण 23 विकेट्स घेतल्या. सिराजने केवळ इंग्लंडविरुद्धच नव्हे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही जबरदस्त कामगिरी केली होती. तो आता भारतीय संघासाठी जिद्दीपणाचं दुसरं नाव बनला आहे.

टीम इंडियासाठी मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध महत्त्वाच्या मालिकांमध्ये भरीव योगदान दिलं. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये त्याने दमदार गोलंदाजी करत लक्ष वेधून घेतलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 5 सामने खेळले आणि 157.1 षटकं टाकत 20 विकेट्स मिळवल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी होती 98 धावांमध्ये 4 विकेट्स. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कामगिरीमुळे त्याने स्वतःला टीम इंडियाच्या सर्वात विश्वासू गोलंदाजांमध्ये सिद्ध केलं.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) फक्त 3 सामने खेळले. मालिकेच्या सुरुवातीलाच ही घोषणा झाली होती. त्यामुळे सिराजवर मोठी जबाबदारी होती आणि त्याने ती पूर्ण ताकदीने पार पाडली. त्याने सर्व 5 सामने खेळले, एकाही सामन्यात विश्रांती घेतली नाही. एकूण 185.3 षटकं टाकत त्याने 23 विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी होती 70 धावा देऊन 6 विकेट्स घेणं. या मालिकेत तो सर्वाधिक मॅडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांपैकी दुसऱ्या क्रमांकावर होता.

एकूणच, बॉर्डर-गावसकर आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मिळून त्याने 342.4 षटकं टाकली आणि 43 विकेट्स मिळवल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलमध्ये झालेला शेवटचा सामना अत्यंत रोचक ठरला. इंग्लंडला विजयासाठी 374 धावांची गरज होती. त्यांनी 367 पर्यंत मजल मारली होती आणि त्यांना फक्त 7 धावांची गरज होती. दुसरीकडे, भारताला फक्त एक विकेट हवी होती. मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता आणि त्याने एटकिन्सनला बाद करत भारताला 6 धावांनी विजय मिळवून दिला.

Comments are closed.