रोहित पवारांना ‘तो’ व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं

अहिलीनगर: महायुती सरकारमधील मंत्र्‍यांच्या वादग्रस्त वक्तव्याने गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांच्या हाती आयतं कोलित देण्याचं काम मंत्र्यांकडून होत आहे. त्यातच, आमदार रोहित पवारांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर पुन्हा मंत्री मेघना बोर्डीकर (मेघना बोर्डीकर) यांच्याकडून ग्रामसेवकाला धमकी दिल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला. त्यावरुन, रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात शा‍ब्दिक वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. आता, अहिल्यानगर दौऱ्यावर आल्या असता मेघना बोर्डीकरांनी संबंधित व्हिडिओवर स्पष्टीकरण देत हा व्हिडिओ रोहित पवारांना (Rohit pawar) कुणी पाठवला, यावरही भाष्य केलं. तसेच, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित गावातील ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या, माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या. मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली, असे स्पष्टीकरण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला दिलेल्या धमकीवरुन व्हायरल व्हिडिओबाबत केले. तसेच, रोहित पवारांना तो व्हिडिओ कुणी पाठवला, याचीही माहितीही त्यांनी स्पष्टपणे दिली. सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत, पण गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे. सरकारच्या योजना लोकांसाठी असतात. मात्र, खऱ्या गरजूंना योजना मिळत नसेल तर त्रागा होणारच. रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे, असा टोला मेघना बोर्डीकर यांनी लगावला आहे.

व्हिडिओबाबत विजय भांबळेंकडे बोट

आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आले आहेत, त्यांनीच हा कार्यक्रम केलाय असे म्हणत बोर्डीकर यांनी संबंधित व्हिडिओ रोहित पवारांना कुणी पाठवला हेच नाव घेता सांगितले. त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहोचवली. रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देत आहेत, असेही त्यांनी म्हटले. मेघना बोर्डीकर यांचा रोख अजित पवार गटाचे नेते विजय भांबळे यांच्याकडे असून भांबळे यांनीच रोहित पवारांना मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ दिल्याचे त्यांनी सूचवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी देखील दिली प्रतिक्रिया

मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरल व्हिडिओवर दिली आहे. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मंत्री मेघना बोर्डीकर आणि संजय शिरसाट यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं

आणखी वाचा

Comments are closed.