मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना आक्रमक, 13 तारखेला रस्ता रोखो आंदोलन करणार – वैभव नाईक

मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. हा महामार्ग अकरा वर्षांपूर्वी सुरू झाला, मात्र सद्यस्थितीत या महामार्गाला जीवघेणे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. हा महामार्ग रखडण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत. गणेशोत्सव सण काही दिवसांवर आला आहे. दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने मुंबईतील चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये आणि या महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा हायवेवरील हुमरमळा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली. कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले परंतु अकरा वर्षे झाली तरी, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. याला नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत. कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे रस्त्याची पडझड होत आहे. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग मागील गणेशोत्सवात पूर्ण होईल असे सांगितले होते मात्र आता दुसऱा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. आणि पुढील एक वर्ष काम पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे.
Comments are closed.