WTC points table: ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाची मोठी झेप, इंग्लंडचं मोठं नुकसान!
ओव्हलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा थरारक सामना 6 धावांनी जिंकला. मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने सामना पूर्णपणे बदलून टाकला. त्याने या सामन्यात एकूण 9 बळी घेत जबरदस्त कहर केला. या विजयानंतर भारताने मालिका 2-2 ने बरोबरीत आणली. ओव्हल टेस्टमधील या विजयाचा मोठा फायदा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्येही झाला आहे. गिलच्या युवा ब्रिगेडने मोठी झेप घेतली, तर इंग्लंडला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे.
पाचव्या टेस्टमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला रोमांचक सामन्यात धूळ चारली. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती आणि त्यांचे 4 गडी शिल्लक होते. मात्र, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या जोडीने इंग्लिश फलंदाजीची पूर्णपणे वाताहत केली. सिराजने शेवटच्या दिवशी तीन महत्त्वाचे बळी घेतले.
मियाँ भाई म्हणजेच मोहम्मद सिराजने गस एटकिंसनला क्लीन बोल्ड करत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचं विजय टक्केवारी आता 46.67 झाली आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे इंग्लंडला मोठा फटका बसला असून ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत.
मोहम्मद सिराजने ओव्हल टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी एकहाती सामना पलटवून टाकला. सर्वप्रथम त्याने जेमी स्मिथला माघारी पाठवले. त्यानंतर जेमी ओव्हरटनला केवळ 9 धावांवर बाद करत दुसरा झटका दिला. प्रसिद्ध कृष्णाने जोश टंगला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला नववा धक्का दिला.
यानंतर तुटलेल्या हातासह क्रिस वोक्स मैदानात उतरले. मात्र खरा धोका गस एटकिंसनकडून होता, कारण तो प्रत्येक चेंडूवर जोरदार फटके मारत होता. पण सिराजने एका अप्रतिम यॉर्करने एटकिंसनला क्लीन बोल्ड केलं आणि इंग्लंडच्या डावासह सामन्याचाही शेवट केला.
Comments are closed.