बीडीडीवासीयांना पुढील आठवड्यात घरांचा ताबा, आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरळी बीडीडीवासीयांना पुढच्या आठवडय़ात नव्या घरांच्या चाव्या मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील वॉर रूममध्ये 30 विकास प्रकल्पांची झाडाझडती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. वरळी बीडीडी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात 556 घरे तयार असून त्यांचा ताबा दिला जाणार आहे.

नायगाव आणि एन.एम. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांनाही ठरलेल्या वेळेत घरे देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये एकूण 33 प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली. मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत आणि मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत तसेच त्यासाठी लागणारा निधी तातडीने वितरीत करण्यात यावा, अशी तंबीही त्यांनी अधिकाऱयांना दिली.

महादेवी आणि कबुतरखानाप्रश्नी आज बैठक

कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण आणि मुंबईतील कबुतरखान्यांच्या विषयाबद्दल उद्या मंगळवारी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या दोन्ही मुद्दय़ांवर प्रमुख लोकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी 29 जुलै रोजी वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला भेट देऊन ‘ई’ विंगची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंत्यांशी चर्चा करून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर 30 जुलै रोजी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज 1 अंतर्गत तयार झालेल्या 556 घरांच्या लाभार्थ्यांना येत्या आठवडाभरात घराचा ताबा द्यावा, अशी मागणी केली होती.

एकनाथ शिंदे गैरहजर

मुंबई आणि परिसरातील अनेक प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. मात्र या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते.

प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती डॅशबोर्डवर नोंदवा

प्रत्येक विभागाचे स्वतंत्र डॅशबोर्ड न करता फक्त सीएम डॅशबोर्डवरच प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती नोंदविली गेलीच पाहिजे. प्रकल्पासंबंधित सर्व गोष्टी या डॅशबोर्डवर वेळोवेळी अद्ययावत करण्यात याव्यात. तसेच प्रकल्पातील अडचणी सोडविण्यासाठी वॉररूम आढावा बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्यात यावी, अशा सक्तीच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

या प्रकल्पांचा घेतला आढावा

धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीडीडी चाळ, सर्व मेट्रो लाईन्स, शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर, ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह टनेल प्रकल्प, गोरेगाव-मागाठाणे डीपी रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि उत्तर सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, बोरिवली ते ठाणे जोड बोगदा प्रकल्प, उत्तन-विरार सी लिंक, दहिसर ते भाईंदर लिंक रोड, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, वाढवण बंदर प्रकल्प.

Comments are closed.