IND vs ENG 5th TEST – विक्रमांची कसोटी

– दोन्ही डावांत 4-4 विकेट ः मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा हे दोघंही एका कसोटीत दोन्ही डावांत 4 पेक्षा विकेट घेणारी फक्त दुसरी हिंदुस्थानी जोडी ठरली. याआधी 1969 मध्ये बिशनसिंह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांनी अशी कामगिरी केली होती.
– 23 विकेट ः सिराजने मालिकेत एकूण 23 विकेट टिपले. त्याने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत हिंदुस्थानकडून सर्वाधिक विकेट टिपणाऱया जसप्रीत बुमराची बरोबरी साधली.
– 195 धावांच्या भागीदारीनंतरही हार ः इंग्लंडसाठी रूट आणि ब्रूक यांनी चौथ्या डावात 195 धावांची भागीदारी रचली, तरीही ते सामना हरले. पराभवात संपलेली ही दुसऱया क्रमांकाची सर्वाधिक भागीदारी ठरली. 2018 मध्ये राहुल-पंत यांनी 204 धावांची भागी केली होती. तरीही हिंदुस्थान पराभूत झाला होता.
– रूट- ब्रूकची शतके असूनही पराभूत ः कसोटीत चौथ्या डावात शतके झळकवूनही पराभव पत्करणारी ही केवळ सातवी जोडी; राहुल-पंत हे मागील उदाहरण.
– इंग्लंडची सलग चौथी मालिका अपयशी ः 2018 नंतर इंग्लंड हिंदुस्थानविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. 1996-2011 दरम्यान इंग्लंडचा सलग 5 मालिका अपयशाचा विक्रम होता.
– हिंदुस्थानचा परदेशातील पाचव्या कसोटीतील दुर्मिळ विजय ः पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात प्रथमच हिंदुस्थानचा विजय. आतापर्यंत 17 मालिका खेळला. अन्य सामने अनिर्णितावस्थेत सुटले होते.
– पाचशेवाले चार फलंदाज ः या मालिकेत अक्षरशः धावांचा आणि शतकांचा पाऊस पडला. शुभमन गिलने चार शतकांसह 754 धावांचा विक्रम रचला. तर सोबतीला ज्यो रुट (537), राहुल (532) आणि रवींद्र जाडेजा (516) यांनी पाचशेपेक्षा अधिक धावा ठोकल्या. तसचे हॅरी ब्रुक, ऋषभ पंत, बेन डकेट, जॅमी स्मिथ आणि यशस्वी जैसवाल यांनी 400 धावांचा टप्पा ओलांडला. त्याचप्रमाणे या मालिकेत एकूण 21 शतके झळकवली गेली. त्यापैकी 12 हिंदुस्थानी तर 9 इंग्लिश फलंदाजांनी ठोकली.
– सामन्यात दहा विकेट नाहीच ः फलंदाजांनी शतकांचा पाऊस पाडला असला तरी गोलंदाजांना फार मोठी कामगिरी करता आली नाही. फक्त आठ वेळाच डावांत 5 विकेट टिपता आले. सिराज आणि बुमराने प्रत्येकी दोनदा पाच विकेट टिपल्या; मात्र एकाही गोलंदाजाला इतक्या मोठय़ा मालिकेत एकदाही सामन्यात दहा विकेट टिपता आल्या नाहीत. सिराजने सर्वाधिक 23 विकेट टिपल्या आणि सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी त्याच्याच नावावर आहे. त्याने 190 धावांत 9 विकेट मिळविल्या आहेत.

Comments are closed.