संतापजनक… पुण्यात दलित महिलांवर पोलिसांकडून ‘अॅट्रॉसिटी’, गुन्हा दाखल करण्यास नकार; सामाजिक कार्यकर्त्यांचा रात्रभर ठिय्या

चौकशीच्या नावाखाली कोथरूड पोलिसांनी तीन दलित मुलींचा छळ करून जातीवाचक शिवीगाळ करीत अॅट्रॉसिटी केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी 24 तास उलटूनही पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले.
आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाण मांडले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. तरीही पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे संतापले. त्यांनी पोलीस अधिकाऱयाला फोन लावून जाब विचारला.
छत्रपती संभाजीनगरातील विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी मदत केली होती. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केले होते. संबंधित महिलेचा नातेवाईक असलेल्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे.
कायदा म्हणजे कायदाच असतो! वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठय़ा संख्येने कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू. असा इशारा आंबेडकर यांनी दिला. 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढत होती. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वेच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
घटनेत तथ्य नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणींनी केला. याप्रकरणी प्राप्त संबंधित मुलींच्या तक्रार अर्जाची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ही घटना वस्तुस्थितीवर आधारित नाही. तसेच घटनेत तथ्य नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता, तसेच अन्य कायद्यान्वये दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही,’ असा अहवाल कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे.
- कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय तीन मुलींच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी मध्यरात्री संबंधित मुलींच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्राrद्वेषी शिवीगाळ केली, अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केली आहे.
Comments are closed.