अंपायरकडून झाली का मोठी चूक? कमी होऊ शकला असता इंग्लंडचा पराभवाचा फरक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय क्रिकेट संघाने पाचवा कसोटी सामना अवघ्या 6 धावांनी जिंकत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. सामना इतका थरारक झाला की शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल हे निश्चित नव्हते. अखेरीस भारताने इंग्लंडला हरवत हातात बाजी मिळवली. मात्र एका खास कारणामुळे इंग्लंडच्या पराभवाचा फरक आणखी कमी होऊ शकला असता.

पाचव्या दिवसाच्या खेळात इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज होती, तर भारताला फक्त 4 बळी हवे होते. वातावरण इतके तणावपूर्ण होते की अंपायर्सवरही दबाव दिसून येत होता. इंग्लंडच्या डावातील 81वे षटक प्रसिद्ध कृष्णाने टाकले. या षटकातील चौथ्या चेंडूवर जोस टंगला बॉल गुडघ्याच्या वरच्या भागावर लागला. त्याने लगेच धाव काढली आणि पूर्णही केली, पण अंपायर अहसान रजा यांनी त्याला एलबीडब्ल्यू दिले.

त्यानंतर टंगने रिव्ह्यू घेतला. हॉक-आय पाहिल्यानंतर समजले की चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जात होता आणि थोडा वरूनही. त्यामुळे टंग खरेतर आऊट नव्हता. थर्ड अंपायरने त्याला नॉटआऊट दिले. मात्र तोपर्यंत अंपायरची बोट वर गेल्याने चेंडू डेड बॉल मानला गेला आणि टंग व एटकिंसनने घेतलेला रन बाद ठरला.

आयसीसीच्या नियमानुसार, रिव्ह्यूमुळे अंपायरचा निर्णय बदलला तरी तो चेंडू डेड बॉल ठरतो. त्यामुळे त्या वेळी केलेल्या धावा ग्राह्य धरल्या जात नाहीत. फक्त आउट किंवा नॉटआऊट यामध्येच बदल होतो. त्यामुळे टंगला नॉटआऊट देण्यात आले, पण धाव नाकारली गेली.

हा रन मान्य झाला असता तर इंग्लंडचा पराभवाचा फरक 6 ऐवजी कमी झाला असता. पण निकालात बदल झाला नसता. अखेरीस मोहम्मद सिराजने घातक मारा करत इंग्लंडच्या शेवटच्या आशाही संपवल्या. त्याने सामन्यात तब्बल 9 बळी घेतले आणि भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Comments are closed.