भिवंडीत सहा महिन्यांत 142 मुले बेपत्ता; 47 मुले, 95 मुलींचा समावेश

मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भिवंडीकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असून गेल्या सहा महि-न्यांत भिवंडीतून तब्बल 142 मुले बेपत्ता झाली आहेत. त्यात 47 मुले आणि 95 मुलींचा समावेश आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कसोशीने तपास करून 126 मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले आहे.

भिवंडीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तांत्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्हीच्या मदतीने मुलांचा शोध घेतला. बेपत्ता झालेल्या 142 मुलांपैकी 126 मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आई-वडिलांसोबत भांडण, प्रेमाच्या फसव्या आणाभाका, परीक्षेच्या निकालात मिळालेले कमी गुण, अशा विविध कारणांच्या नैराश्येतून या मुलांनी घर सोडल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी मुलांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.


अनेक मुलींची परराज्यातून सुटका
बेपत्ता झालेल्या 95 मुलींपैकी अनेक अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून परराज्यात पळवून नेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परराज्यातील पोलीस दलाच्या मदतीने तपास करून मुलींची सुटका केली.

ऑनलाइन क्लासेस किंवा विरंगुळा म्हणून पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिले खरे मात्र सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. मुले वाईट मार्गाने जाऊ नयेत यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- डॉ. विशाल तेली,मानसोपचारतज्ज्ञ, ठाणे जिल्हा रुग्णालय

Comments are closed.