एखादी धार्मिक जागा खाजगी कशी असू शकते?
सर्वोच्च न्यायालयाची विचारणा : बांके बिहार मंदिर कॉरिडॉर प्रकरणी सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयात बांके बिहारी मंदिर कॉरिडॉर प्रकरणी सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील श्याम दीवान यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करत खासगी मंदिर असल्याचा दावा केला. मंदिराचे उत्पन्न केवळ स्वत:साठी नव्हे तर मंदिर विकास योजनांसाठी देखील असल्याचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले आहे. तर दीवान यांनी सरकारच्या योजनेवर एकतर्फी आदेशाला आव्हान देत असल्याचा युक्तिवाद केला. तसेच न्यायालयाने धार्मिक स्थळाला खासगी कसे म्हटले जाऊ शकते, जेथे अनेक भाविक येतात ते खासगी असू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ करत आहे. मंदिराशी निगडित व्यवस्था राज्य सरकारने एका ट्रस्टला सोपविण्याचा अध्यादेश जारी केला असून यालाच याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आले आहे. बांके बिहारी मंदिर एक खासगी धार्मिक संस्था असून अध्यादेशाद्वारे मंदिरावर सरकार अप्रत्यक्ष स्वरुपात नियंत्रण मिळवू पाहत असल्याचा दावा याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
दोन व्यक्तींच्या खासगी वादाशी निगडित दिवाणी वादात न्यायालयाते बांके बिहारी मंदिरावरून आदेश दिला, तर सुरक्षा, तपासणी नाका आणि सार्वजनिक सुविधांची व्यवस्था सुनिश्चित करण्याची सरकारची जबाबदारी असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील दीवान यांनी केला.
राज्य सरकार जमीन खरेदी करण्यासाठी मंदिराच्या निधीचा वापर करू पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला. यावर राज्य सरकारचा उद्देश मंदिराचा निधी हडप करणे नसून मंदिराच्या विकासाचा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मंदिर व्यवस्थापन समितीत चार सेवाधिकारी गोस्वामी निवडले जातात. गोस्वामींसोबत वृंदावन किंवा ब्रजमधील समाजाचे तीन प्रतिष्ठि लोक असतात. समिती तीन वर्षांसाठी निवडले जाते, 2016 मध्ये समितीची अखेरची निवडणूक झाली होती असे दीवान यांनी सांगितले.
देवता खासगी कशी असू शकते
हे नो मेन्स लँड नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. अडीचशेपेक्षा अधिक गोस्वामी एकजूट असून ते मंदिर व्यवस्थापन सांभाळत आहेत असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळाला खासगी कसे म्हणू शकता? असंख्य भाविक येत असलेले धार्मिक स्थळ खासगी असू शकत नाही. व्यवस्थापन खासगी असू शकते. परंतु कुठलीही देवता खासगी कशी असू शकते अशी प्रश्नार्थक टिप्पणी खंडपीठाने केली आहे.
Comments are closed.