भाजप आमदाराच्या संघटनेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव, मंत्रालयातून फोन करणारा ‘तो’ मंत्री कोण?

भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी परिवहन कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे हजारो प्रवाशांना वेठीला धरण्यात आले. नागरिकांना वेठीला धरणाऱ्या संघटनेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी पोलिसांना पत्र लिहून त्याची प्रक्रियादेखील सुरू केली. पण गुन्हा दाखल होऊ नये यासाठी मंत्रालयातून भाजपच्या एका मंत्र्याने फोन करुन दबाव आणला असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. दबाव आणणारा तो मंत्री कोण, याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
श्रमिक जनरल कामगार संघटनेने 1 ऑगस्ट रोजी पहाटे परिवहनचा संप सुरू केला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या तसेच शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. मीरा-भाईंदरमधून बसने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वैद्यकीय सुविधा, मासिक वेतन, दिवाळी सानुग्रह अनुदान अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला होता.
प्रवाशांचा संतप्त सवाल
महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी परिवहन विभागाचे उपव्यवस्थापक स्वप्नील सावंत यांना काशीगाव पोलीस ठाण्यात जाऊन श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी लेखी पत्रदेखील दिले. पण प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. मंत्रालयातून भाजपच्या एका मंत्र्याने पोलिसांना फोन करून गुन्हा होऊ नये यासाठी दबाव तंत्राचा वापर केला. या राजकारणामध्ये आम्हाला वेठीला का धरता, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
Comments are closed.