भारताचे हे खेळाडू काढणार विराट-रोहितचा काटा, 2027 वर्ल्ड कप खेळणार की नाही, चर्चांना उधाण

विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 एकदिवसीय विश्वचषक खेळतात: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या हे दोघं केवळ वनडे फॉर्मेटमध्येच खेळत आहेत. मात्र 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये हे दिग्गज खेळतील का, यावर आता मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळेस विराट आणि रोहित हे दोघंही जवळपास 40 वर्षांचे असतील. त्यामुळे 2027 च्या वर्ल्ड कपसाठी एक स्पष्ट आणि दीर्घकालीन योजना तयार करणं गरजेचं आहे, असं सांगितलं जातंय. कारण भारताने शेवटचा वनडे वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता.

भारताचे युवा खेळाडू काढणार विराट-रोहितचा काटा

सूत्रांनी असंही म्हटलं आहे की, पुढील वर्ल्ड कपच्या आधी काही युवा खेळाडूंना संधी देणं अत्यावश्यक आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. पाच सामन्यांची टेस्ट सिरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली आणि सर्वच सामन्यांमध्ये टीम इंडियाने तगडी लढत दिली. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांसारख्या नवख्या खेळाडूंनी चांगली छाप पाडली.

वर्ल्ड कपपूर्वी ‘प्रोफेशनल’ चर्चा होणार

सूत्रांनी सांगितलं, “वर्ल्ड कपसाठी अजून दोन वर्षांपेक्षा अधिक वेळ आहे. पण विराट आणि रोहित त्या वेळी 40 वर्षांजवळचे असतील. त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी एक स्पष्ट दिशा असणं आवश्यक आहे. त्याआधी काही तरुण चेहऱ्यांना संधी देणंही गरजेचं आहे.”

2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित आणि विराटने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये दोघांचाही फॉर्म कमकुवत दिसला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच दोघांनी कसोटी क्रिकेटलाही अलविदा केलं. या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आलं की, काय त्यांना टेस्टमधून जबरदस्तीने निवृत्त व्हावं लागलं का? आणि आता वनडे क्रिकेटमधूनही त्यांना हळूहळू बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का?

वनडेतून निवृत्तीबाबत दबाव नाही

सूत्रांनी स्पष्ट केलं, “विराट आणि रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी जवळपास सगळं काही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवृत्ती घेण्यासाठी कोणताही दबाव टाकला जाणार नाही. मात्र वर्ल्ड कप चक्र सुरू होण्याआधी त्यांच्याशी व्यावसायिक पातळीवर चर्चा होईल. त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती काय आहे, हे तपासलं जाईल.”

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ‘अग्निपरीक्षा’

मार्च महिन्यात दोघांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना (चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल) खेळला होता. येणारी चॅम्पियन्स ट्रॉफी टी-20 फॉरमॅटमध्ये असल्यामुळे हे दोघं त्यात खेळणार नाहीत. ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्धची वनडे सिरीज स्थगित झाली आहे. आता भारताची पुढील वनडे सिरीज ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि नंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये विराट आणि रोहितला जबरदस्त कामगिरी करत आपल्या जागेचं पुनरुज्जीवन करावं लागणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.