सिराज, कृष्णाची क्रमवारीत झेप! बुमरा अव्वल, जैसवाल टॉप-5 मध्ये

संस्मरणीय ठरलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत अखेरच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारा हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी आयसीसीच्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानी झेप घेतलीय. या सामन्यात सिराजने 9, तर कृष्णाने 8 विकेट टिपले होते.
मोहम्मद सिराजने तब्बल 12 स्थानांची झेप घेत 15वे स्थान मिळवले असून, त्याचे 674 गुण झाले आहेत. प्रसिध कृष्णानेही तब्बल 25 क्रमांकाची प्रगती करत 59व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याचे 368 गुण झाले आहेत. याचबरोबर जसप्रीत बुमरा 889 गुणांसह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीत सिराजने पाच कसोटीत सर्वाधिक 23 बळी टिपले. प्रसिध कृष्णाने तीन कसोटींत 14 बळी मिळविले.
जैसवाल कसोटी फलंदाजीत टॉप-5 मध्ये
अखेरच्या कसोटीच्या दुसऱया डावात 164 चेंडूंत 118 धावांची खेळी करत तीन स्थानांनी झेप घेणारा यशस्वी जैसवाल कसोटी फलंदाजांच्या यादीत टॉप-5 मध्ये पोहोचला. त्याचे आता 792 रेटिंग पॉइंट्स झाले आहेत. इंग्लंडचा जो रूट व हॅरी ब्रूक अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानी कायम आहेत. रूटने दुसऱया डावात 152 चेंडूंत 105 धावा, तर ब्रूकने 98 चेंडूंत 111 धावा केल्या.
जाडेजा अव्वल अष्टपैलू
ओव्हलवर 53 धावांची खेळी करणारा हिंदुस्थानचा रवींद्र जाडेजा 405 गुणांसह कसोटीमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (295 गुण) तिसऱया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.
Comments are closed.