अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्वीप्रमाणेच राहू द्या! शिवसेनाप्रमुखांमुळे मिळाली आहे सुट्टी, गणेशोत्सव समितीची मागणी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे लागू करण्यात आलेली अनंत चतुर्दशीदिवशी मिळणारी सुट्टी पूर्वीप्रमाणेच राहू द्या, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. शिवसेनेच्या सत्ताकाळात 1995 पासून गेल्या 30 वर्षांपासून ही सुट्टी लागू करण्यात आली आहे. ही सुट्टी राज्य सरकारने आज रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे नोकरदारांची मोठी गैरसोय होणार असल्याचे गणेशोत्सव समितीने सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठय़ा प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कामगारांना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या दिवशी लागू असणारी सुट्टी कायम ठेवा, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केल्याचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले. राज्यात 1995 मध्ये गणेशोत्सव समितीने शिवसेनेच्या सत्ताकाळात अनंत चतुर्दशीदिवशी सुट्टी मिळावी आणि महापालिकेची मैदाने गणेशोत्सवासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली होती. यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना समन्वय समितीच्या मागणीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी लागू करण्यात आली आहे.
…तर गर्दी, वाहतुकीचे नियोजन कठीण
6 सप्टेंबर रोजी शनिवार असल्याने शासकीय कार्यालये बंद असली तरी खासगी आस्थापने सुरू राहतील. यामुळे वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करणे जिकिरीचे होणार आहे. शिवाय मुंबईतील 12 हजारांवर असणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक निघणार असल्यामुळेही कामगारांची गैरसोय होणार असल्याचे गणेशोत्सव समितीने म्हटले आहे.
Comments are closed.