उपाध्यक्षपदाचे उमेदवार कोण असेल?

रालोआच्या बैठकीत चर्चा : पंतप्रधान मोदींसह जे. पी. नड्डा यांना नावनिश्चितीचे अधिकार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी रालोआ (एनडीए) संसदीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. या बैठकीत उमेदवार निश्चित करण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेतील सभागृहनेते जे. पी. नड्डा यांना देण्याचा निर्णय  एकमताने घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी ठरविलेला उमेदवार सर्व पक्षांना मान्य असेल, असे एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व नेत्यांनी ठरविले आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएमध्ये तयारी जोरात सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. एनडीए संसदीय पक्षाच्या फ्लोअर लीडरच्या बैठकीनंतर रिजिजू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनडीए संसदीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे एनडीएने पंतप्रधान मोदी आणि राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना उमेदवार निवडीसह सर्व प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकार एकमताने दिले. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय सर्व एनडीए पक्षांना मान्य असेल, असे रिजिजू यांनी सांगितले.

एनडीएच्या बैठकीला उपस्थित नेते

संसद भवनात गुरुवारी एनडीए नेत्यांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा , संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, लोजपाचे चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, जेडीयूचे लालन सिंह, अपना दलाच्या अनुप्रिया पटेल, आरपीआयचे रामदास आठवले यांच्यासह अन्य काही नेते या बैठकीला उपस्थित होते.

अधिसूचना जारी केली, नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होते

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. आता या निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्यास 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणीही त्याच दिवशी होईल आणि निकालही त्याच दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे कामकाज चालवल्यानंतर धनखड यांनी रात्री उशिरा अचानक राजीनामा दिला होता. दुसऱ्याच दिवशी राष्ट्रपतींनी त्यांचा अर्ज स्वीकारला होता.

शेषाद्री चारी यांचे नाव चर्चेत

रालोआमधील उमेदवार कोण असेल याबाबत सस्पेन्स कायम आहे. तथापि, आरएसएसचा जुना आणि विश्वासू चेहरा असलेले शेषाद्री रामानुजन चारी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण भारतातील चारी हे केवळ वैचारिक ताकदीसाठीच नव्हे तर राजकीय संतुलनासाठीही भाजपसाठी एक महत्त्वाचा चेहरा मानले जातात. शेषाद्री चारी यांचा जन्म मुंबईत झाला होता, परंतु त्यांचे कुटुंब तामिळनाडूतील तंजावरशी संबंधित आहे. ते दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून विचारसरणीचे ते एक कट्टर समर्थक मानले जातात. चारी हे केवळ राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जात नाहीत तर त्यांना परराष्ट्र धोरणाच्या बाबींचीही सखोल जाण आहे.

Comments are closed.