पुतीन लवकरच भारतात भेट देण्यासाठी
दोन आठवड्यांमध्ये दौरा होणार, मोठे करार शक्य
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे लवकरच भारत भेटीसाठी येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ही माहिती पत्रकारांना गुरुवारी दिली आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्वाचा मानण्यात येत आहे. भारत आणि रशिया यांच्यात प्रदीर्घ काळापासून मैत्रीचे संबंध आहेत. या संबंधांचा मोठा लाभ दोन्ही देशांना झाला आहे. अशा स्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत, ही बाब आनंददायक आहे, असे वक्तव्य डोभाल यांनी केले. पुतीन यांच्या भारतभेटीचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही. तथापि, अमेरिकेचा कर लागू होण्याच्या आधी ते भारतात येतील, अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुतीन यांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात मोठे करार होतील, असे बोलले जात आहे.
अमेरिकेची रशियालाही धमकी
रशियाने युक्रेनशी युद्ध येत्या दोन दिवसांमध्ये थांबविले नाही, तर रशियावर दुय्यम निर्बंध (सेकंडरी सॅन्क्शन्स) लागू करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेने दिली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता चार वर्षे पूर्ण होत आहेत. हे युद्ध रशिया आणि पाश्चिमात्य देश यांच्यातील संघर्षाचा बिंदू ठरला आहे. या वादाच्या मुद्द्याभोवती सध्या जगाचे राजकारण फिरत आहे.
पुतीन-ट्रंप भेटही होणार
व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर येण्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि व्लादिमिर पुतीन यांची भेट होण्याची शक्यता आहे. ही भेट येत्या काही दिवसांमध्येच होण्याची शक्यता रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही देशांकडून या भेटीसाठी सज्जता करण्यात येत असून दोन्ही देश यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांचे सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी दिली.
तरीही निर्बंध राहणारच…
पुतीन आणि ट्रंप यांच्यात चर्चा झाली आणि रशिया-युव्रेन युद्धावर काही तोडगा निघाला, तरीही रशियाच्या व्यापार भागीदारांवर निर्बंध घालण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. अमेरिकेने भारतावर रशियाच्या तेलाची विक्री जागतिक बाजरात करण्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे भारतावर अधिक प्रमाणात कर लागू करण्याचा इशारा दिला आहे.
Comments are closed.