केरळच्या वर्गात 'बॅकबेंचर्स' होणार नाही.
राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती : तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार निवडणार प्रारुप
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
भारतात साक्षरतेचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये केरळचा प्रामुख्याने समावेश आहे. आता केरळ राज्य स्वत:च्या शाळांमध्ये आणखी एक मोठा अन् अनोखा पुढाकार राबविणार आहे. आतापर्यंत वर्गांमध्ये पारंपरिक पद्धतीने मुलांना रांगेत बसविले जायचे, यात सर्वात पुढे बसणारे विद्यार्थी टॉपर आणि मागे बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बॅकबेंचर’ ठरविले जायचे. परंतु केरळ शिक्षण विभागाने ही व्यवस्था संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कुठलाही विद्यार्थी स्वत:ला मागे किंवा कमी समजणार नाही, अशाप्रकारचा वर्ग डिझाइन करण्याचा विचार आहे. ‘बॅकबेंचर’सारखा विचार असूच नये, कारण यामुळे मुलांच्या आत्मविश्वासावर प्रभाव पडतो. सर्व मुलांना समान संधी मिळायला हवी, असे उद्गार राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी काढले आहेत.
अनेक देशांच्या प्रारुपावर अध्ययन
राज्य सरकार एक तज्ञ समिती स्थापन करणार आहे. ही समिती विविध देशांमध्ये अवलंबिण्यात येणाऱ्या प्रारुपांचे अध्ययन करणार आहे. अनेक देशांमध्ये बॅकबेंचर ही संकल्पनाच नाही. मग समितीच्या शिफारसीनुसार केरळसाठी सर्वात चांगले प्रारुप निवडले जाणार असल्याचे शिक्षणमंत्री शिवनकुट्टी यांनी सांगितले आहे.
काही शाळांमध्ये परीक्षण
प्रत्यक्षात हा प्रयोग यापूर्वीच केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाला आहे. कन्नूर, त्रिशूर आणि कोल्लमच्या काही शाळांमध्ये यापूर्वीच वर्गातील विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था बदलण्यात आली आहे. आता तेथील विद्यार्थी ‘यू-शेप’मध्ये वर्गात बसतात, यामुळे सर्व जण एकमेकांसमोर येतात आणि शिक्षक या सर्वांदरम्यान फिरून सहजपणे शिकवू शकतात.
त्रिशूरच्या शाळेने बदलले चित्र
त्रिशूर जिल्ह्यातील पूर्व मंगड येथील आरसीसी कनिष्ठ प्राथमिक शाळेने या बदलाची सुरुवात केली होती. चालू शैक्षणिक सत्राच्या प्रारंभातच काही शिक्षकांनी संबंधित चित्रपटाचा उल्लेख केला आणि स्वत:च्या शालेय जीवनाचे अनुभव मांडले होते. मग इयत्ता पहिलीच्या वर्गातून या पुढाकाराची सुरुवात करत मुलांना यू-शेपमध्ये बसविण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका लिजी सी.आर. यांनी दिली आहे.
चित्रपटाद्वारे मिळाली प्रेरणा
हा पूर्ण बदल एका मल्याळी चित्रपटाने देखील प्रेरित आहे. या चित्रपटाचे नाव ‘स्थानार्थी श्रीकुट्टन’ (2024 मध्ये प्रदर्शित) असून यात एक असा मुलगा दाखविण्यात आला आहे, जो वर्गात नेहमी मागे बसतो आणि व्यवस्थेने त्रस्त होत बंड करतो. चित्रपटाच्या अखेरच्या दृश्यात वर्गाचे पारंपरिक डिझाइन हटवून ‘यू-शेप’मध्ये बसण्याची व्यवस्था दाखविण्यात आली आहे. यातून वर्गाच्या वातावरणाचा मुलांचा आत्मविश्वास आणि शिक्षणावर प्रभाव पडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
Comments are closed.