मान खाली कर; आम्ही म्हणेल तसं वागायचं!बीएफआयच्या पदाधिकाऱ्याने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा लवलीनाचा आरोप

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून देणारी बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (बीएफआय) कार्यकारी संचालक निवृत्त कर्नल अरुण मलिक यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. आपल्याला अपमानजनक आणि लैंगिक भेदभाव करणारी वागणूक मिळाली, अशी तक्रार लवलीनाने केली आहे.
27 वर्षीय लवलीनाने दोन पानांची तक्रार पत्राद्वारे क्रीडामंत्री मनसुख मांडविया, ‘साई’चे महासंचालक, आयओए आणि बॉक्सिंग फेडरेशनकडे ही तक्रार सादर केली आहे. लवलीनाने आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘8 जुलैला टॉप्स आणि बीएफआयच्या झूम मीटिंगमध्ये कर्नल मलिक यांनी माझ्याशी अपमानास्पद आणि तिरस्कारपूर्ण वर्तन केले. मीटिंगनंतर मला खूप दुःख झालं, मी निराश आणि त्रस्त झाले. आम्ही महिला खेळाडू खरंच सन्मानास पात्र आहोत का, हा प्रश्न मला पडला. मी हे पत्र खेळाडू म्हणून नव्हे, तर एक महिला म्हणून लिहित आहे.’ तक्रारीनुसार ‘कर्नल मलिक यांनी झूम मीटिंगमध्ये माझ्यावर ओरडत ‘चूप राहा, मान खाली करा आणि जे सांगितले जाते तेच करायचं.’ त्यांचे वर्तन केवळ अपमानास्पद नव्हते, तर महिलांविषयी भेदभाव आणि सत्तेचे प्रदर्शन होते.’
‘आयओए’ने तत्काळ चौकशी सुरू केली
हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) या आरोपांची चौकशी सुरू केली असून तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत टॉप्सचे सीईओ नछत्तर सिंग जोहल, टेबल टेनिसपटू शरत कमल आणि एक महिला वकील यांचा समावेश आहे.
‘माझी बदनामी केली जात आहे’
विवाद वाढल्यानंतर कर्नल अरुण मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘माझी बदनामी केली जात आहे. मीटिंगमध्ये लवलीनाने दोन मागण्या केल्या होत्या. ती हंगेरियन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तिथेच जाऊन प्रशिक्षण घेऊ इच्छित होती, मात्र त्यावेळी स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर झालेला नव्हता. मलिक म्हणाले, ‘मी स्पष्ट केलं की संघ जाहीर झाल्यावरच पुढील प्रक्रिया होईल. लवलीनाने हंगेरियामध्ये तिचा वैयक्तिक प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्ट घेऊन जाण्याची मागणी केली होती. झूम कॉलमध्ये तिची वैयक्तिक प्रशिक्षकही सहभागी होती. यावर मलिक म्हणाले, ‘सरकार आणि ‘बीएफआययू’ या नियमानुसार बॉक्सिंगमध्ये वैयक्तिक प्रशिक्षकांना परवानगी नाही. एका प्रशिक्षकाने किमान पाच बॉक्सरना प्रशिक्षण द्यावे लागते. ‘यावर लवलीना म्हणाली की, ‘पी. व्ही. सिंधू वैयक्तिक प्रशिक्षकासह जात असते. यावर बीएफआयच्या अधिकाऱयांनी सांगितले की, ‘ही माहिती चुकीची आहे, सिंधूदेखील पॅम्पच्या प्रशिक्षकांकडूनच प्रशिक्षण घेते.’
Comments are closed.