नितीष कुमार, शाह करण्यासाठी पाय पाय.
वृत्तसंस्था/पाटणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते बिहारमधील पुनौरा धाम येथे माता सीता मंदिराचा शिलान्यास करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुरुवारी संध्याकाळी बिहारची राजधानी पाटणा येथे पोहचले. शिलान्यास कार्यक्रम आज शुक्रवारी होणार आहे. या कार्यक्रमाला एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. स्थानिक खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी ही माहिती दिली. या भव्य कार्यक्रमाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि इतर मान्यवर नेत्यांनी गुरुवारी या मंदीर परिसराला भेट देऊन पाहणी केली.
नेपाळच्या भाविकांनाही निमंत्रण
या कार्यक्रमाचे निमंत्रण बिहारला लागून असलेल्या नेपाळच्या भाविकांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे ते ही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. सीता माता मंदीर हे केवळ एक धर्मस्थळ नसून हा परिसर एका पर्यटन संकुलाप्रमाणे विकसीत करण्याचा बिहार सरकारचा विचार आहे. या संकुलात लव-कुश वाटिका, प्रदर्शन केंद्र, खाद्यपेयगृह, बालोद्यान आणि इतर वास्तूंचे निर्माणकार्यही करण्यात येणार आहे. चंद्रकांत सोमपुरा हे या मंदिराचे रचनाकार असून हे मंदीर अयोध्येतील भगवान रामलल्लांच्या मंदीराच्या धर्तीवर निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती बिहार सरकारच्या सूत्रांनी दिली आहे. हे मंदीर 158 फूट उंच असेल. या मंदिराला जोडून ‘राम-जानकी मार्ग’ हा एक पर्यटन कॉरीडॉरही साकारण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.