जसप्रीत बुमरावर टीका करणाऱ्यांना हर्षा भोगलेचं प्रत्युत्तर, ट्विट करत जोरदार सुनावलं

इंग्लंड दौर्‍यात (IND vs ENG) जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) वर्कलोड मॅनेजमेंटवरून चांगलाच गोंधळ झाला. ओव्हल कसोटी सामन्यात बुमराह न खेळल्याने टीकाकारांनी टीम इंडियाच्या सर्वात भरोसेमंद गोलंदाजालाही प्रश्नांच्या कठड्यात उभं केलं. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने जिंकलेले दोन्ही कसोटी सामने हे असे होते ज्यात बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता.

सिराजने (Mohmmed Siraj) मात्र पाचही सामने खेळले आणि संपूर्ण मालिकेत सर्वाधिक गोलंदाजी केली. सिराजचं उदाहरण देत बुमराहला ट्रोल करण्याचाही प्रयत्न झाला. याच दरम्यान प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले (Harsha Bhogale) यांनी बुमराहची टीका करणाऱ्यांना आरसा दाखवला.

अलीकडच्या पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय (BCCI) वर्कलोड मॅनेजमेंटसाठी नवीन आणि कठोर नियम आणण्याच्या तयारीत आहे. बोर्डाने सर्व खेळाडूंना स्पष्ट सांगितले आहे की, भविष्यात ते स्वतः ठरवू शकणार नाहीत की कोणता सामना खेळायचा आणि कोणता टाळायचा. खेळाडूंच्या वर्कलोडची जबाबदारी टीम मॅनेजमेंटची असेल. तसेच कोणत्या सामन्यात खेळाडू खेळणार आणि कोणत्या सामन्यात विश्रांती घेणार याचा अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंट किंवा निवड समिती घेईल.

हर्षा भोगलेंनी केलेलं ट्विट, खरंच?? बुमराहला ट्रोल करताय? आशा आहे की तुम्ही त्यांच्यातले नसाल. पण जर असाल, तर एवढंच सांगायचं की बुमराहसारखा खेळाडू होण्यासाठी काय सहन करावं लागतं याची तुम्हाला कल्पनाच नाही आणि भारताच्या सर्वात मोठ्या ‘मॅचविनर’पैकी एकाबद्दल तुम्हाला कणभरही कदर नाही, जो बाकी जवळपास सगळ्या गोलंदाजांपेक्षा जास्त षटके टाकतो.

Comments are closed.