सूर्यकुमार यादव पुनरागमनासाठी आतुर

हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी पुनरागमनासाठी जोरदार मेहनत घेतोय. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या यशस्वी स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेची माहिती सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर दिली होती. शुक्रवारी त्याने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो जिममध्ये घाम गाळताना व फिटनेस परत मिळवण्यासाठी विविध व्यायाम करताना दिसत आहे. पोस्टला त्याने कॅप्शन दिले, जे मला आवडतं ते पुन्हा करण्यासाठी मी आतुर आहे. म्हणजेच तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर षटकारांची आतषबाजी करण्यासाठी तयार होतोय.

गेल्या आठवडय़ातील एका अहवालानुसार, शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आपल्या फिटनेसवर मेहनत घेतोय. पुढील काही आठवडय़ांत त्याची जबाबदारी वाढणार आहे. तो 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी पूर्णपणे सज्ज असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हिंदुस्थानचा संघ यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे. हा स्पर्धा आगामी टी-20 विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्यासाठी हिंदुस्थानच्या मोहिमेची सुरुवात ठरेल. या स्पर्धेचे सहआयोजन हिंदुस्थान आणि श्रीलंका करतील.

जून 2024 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा टी-20 स्वरूपातून निवृत्त झाला आणि सूर्यकुमारला हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे नेतृत्व देण्यात आले. 34 वर्षीय सूर्या शेवटचा मुंबई टी-20 लीगदरम्यान खेळताना दिसला होता, जिथे त्याने ट्रम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाचे प्रतिनिधित्व केले. 4 डावांत 122 धावा करत त्याने स्पर्धेतील आपली मोहीम पूर्ण केली. आयपीएल 2025 हंगामात सूर्यकुमारने जबरदस्त फॉर्म दाखवला. त्याच्या विक्रम मोडणाऱ्या खेळीतून मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. सलग 16 डावांत किमान 25 धावा करण्याचा विक्रम त्याने प्रस्थापित केला, जो जागतिक स्तरावर पहिलाच आहे. हंगामाचा शेवट त्याने 717 धावांसह केला.

Comments are closed.