संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीमध्ये मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या रिटेन आणि रिलीज प्रक्रियेत कर्णधार संजू सॅमसनची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र आता तोच संघासोबत राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संघात आधीच संजू आणि यशस्वी जैसवाल हे दोन सलामीवीर असून, ध्रुव जुरेलला वरच्या क्रमांकावर खेळवण्याची योजना आहे. त्यात वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्मात असल्याने सलामीच्या जागेवर तिढा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संजूला राजस्थान रॉयल्स सोडायची इच्छा असल्याचा खळबळजनक दावा हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा याने केला.

गेल्या काही दिवसांपासून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वीच फ्रेंचायझीकडून ट्रेडिंग विंडोमध्ये संजू सॅमसन किंवा इतर कोणत्याही खेळाडूला ट्रेड न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, मात्र गुरुवारी संजूनं फ्रेंचायझीला पत्र लिहून स्वतःला रिलीज करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली. संजू 2026 साली राजस्थानकडूनच खेळणार की दुसऱ्या संघात जाणार याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

आकाश चोप्राने एका ‘यूटय़ूब’ चॅनेलवर सांगितले की, संजूने 2013 ते 2015 या काळात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दोन हंगाम तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. 2018 मध्ये राजस्थानने त्याला पुन्हा ताफ्यात घेतले आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 2022 आयपीएलची अंतिम फेरी गाठली. 2008 नंतर प्रथमच राजस्थान फायनलमध्ये पोहोचला होता, मात्र गेल्या हंगामात फ्रेंचायझीची कामगिरी निराशाजनक ठरली. दुखापतीमुळे संजू काही सुरुवातीच्या सामन्यांत खेळू शकला नाही, ज्याचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झाला.

संजू संघ सोडण्यामागील कारणांबाबत चोप्रा म्हणाले की, मागील मेगा ऑक्शनमध्ये जॉस बटलरला रिलीज करण्यात आले आणि यशस्वी जैसवालला संजूसोबत सलामीला पाठवण्याचा निर्णय झाला. आता वैभव सूर्यवंशीच्या आगमनामुळे सलामीसाठी पर्याय वाढले असले तरी, जागेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळेच संजूच्या या निर्णयामागे ओपनिंग स्लॉटवरील स्पर्धा हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

Comments are closed.