मतदानाच्या चोरीसाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे!
राहुल गांधी यांचा निशाणा : बेंगळुरातील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींवरही आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत घोटाळा केल्याची बाब सत्य आहे. मतदारयादीची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आणि मतदान केंद्रांवर केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग दिले तर आम्ही मतांची चोरी झाल्याचे सिद्ध करू, असे आव्हान लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मतांमध्ये फेरफार झाला आहे. याला निवडणूक आयोगच जबाबदार आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसने शुक्रवारी बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर आयोजिलेल्या ‘आमचे मत, आमचा हक्क’, ‘संविधान वाचवा आंदोलन’ या सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचे 100 टक्के सत्य आहे. मतांची चोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी मतांची चोरी करून संविधानाचे उल्लंघन केले आहे. जर मतदान केंद्रांची इलेक्ट्रॉनिक माहिती आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे दिले तर आम्ही हा घोटाळा सिद्ध करून दाखवू, असे आव्हान राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिले.
लोकसभा निवडणुकीत बेंगळूरच्या महादेवपूर मतदारसंघात झालेल्या मतांची चोरी आम्ही पुराव्यासह उघड केली आहे. हे सत्य पडताळण्यासाठी आम्हाला 6 महिने लागले. मागितलेली माहिती निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावी. आम्ही देशातील कोणत्या मतदारसंघात मतदानात फेरफार झाला आहे, हे सिद्ध करून दाखवू. जर मागितलेली माहिती आयोगाने दिली नाही तर ते एखाद्या गुन्ह्याला पाठिंबा देण्यासारखे आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला माहिती दिली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. माहिती मिळविण्यासाठी आणि मतदानातील फेरफार सिद्ध करण्यासाठी जे करावे लागेल ते आम्ही करून, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.
आंदोलन सुरूच राहील
संविधान हे देशातील गरिबांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. आम्ही या संविधानाचा अपमान होऊ देणार नाही, गैरवापर होऊ देणार नाही. मतांच्या चोरीविरुद्ध आंदोलन सुरूच राहील. संविधानात ‘एक व्यक्ती एक मत’ या तत्त्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे. मात्र, मागील निवडणुकीत मोदींनी संविधानावरच हल्ला केला. त्यांनी संविधान संपविण्याचे कारस्थान रचले आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला.
सहापैकी एका मताची चोरी
बेंगळूर सेंट्रल मतदारसंघातील निवडणूक निकालाचे विश्लेष्ण केले असता महादेवपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाखांपेक्षा अधिक बोगस मतदान झाले आहे. म्हणजेच 6 पैकी एका मताची चोरी झाली आहे. गुरुकिरण सिंग या व्यक्तीचे नाव 4 बूथमधील मतदारयादीत सापडले आहे. आदित्य श्रीवास्तव नामक व्यक्तीला कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेशमध्ये मतदानाचा हक्क प्राप्त आहे. म्हणजेच एक व्यक्ती विविध तीन ठिकाणी मतदान करू शकते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
कारस्थान उघड होण्याच्या भीतीने वेबसाईट बंद
राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीचा पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करावे किंवा माफी मागावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यावर राहुल गांधी तीव्र शब्दात टीका केली आहे. मी आकडेवारी उघड केल्यानंतर जनतेने प्रश्न उपस्थित करताच निवडणूक आयोगाने आपली वेबसाईट बंद केली आहे. आपले कारस्थान उघड होईल, या भीतीमुळे आयोगाने वेबसाईट बंद केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या. मात्र चार महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला. हा निकाल पाहून मला धक्का बसला. यामागील सत्य शोधले असता 1 कोटी नव्या मतदारांनी मतदान केल्याचे आढळले. लोकसभा निवडणुकीत मतदान न केलेल्या 1 कोटी मतदारांनी विधानसभा निवडणकीत मतदान केले. ही मते भाजपला गेली. हा प्रकार गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद?
अनेक राज्यांतील निवडणूक आयोगाचे वेबसाईट ओपन होत नसल्याचा स्क्रिन शॉट अनेक जणांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहे. राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, काही जणांनी महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थान यासह अनेक राज्यांच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये व्यत्यय येत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळला आहे.
बोगस मतांमुळे माझा पराभव : खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बोगस मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाला. माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो होतो. बोगस मतांमुळेच माझा पराभव झाला होता. ते आता उघडकीस आले आहे. निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानुसार काम करते, असा आरोपही खर्गे यांनी केला.
2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे मतांची चोरी करून देशाचे पंतप्रधान बनले. राहुल गांधी यांनी सलग सहा महिने बेंगळूरच्या महादेवपूर विधानसभा मतदारसंघातील 6.60 लाख मतदारांची माहिती पडताळून गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. देशाचे संविधान वाचविणे, प्रौढांच्या मतदानाच्या हक्काचे रक्षण करणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे हा आमचा प्रयत्न आहे. जनतेने मत दिले नसले तरी मोदी, अमित शहा हे मतांची चोरी करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
मोदींनी राजीनामा द्यावा!
लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. निवडणूक आयोग हे भाजपचे शाखा कार्यालय आहे. मतचोरीविरुद्ध कर्नाटकातून सुरू झालेली रॅली संपूर्ण देशात व्यापणार आहे.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
राहुल गांधींना एकमताने पाठिंबा!
राहुल गांधी यांनी संविधान आणि मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांना आमचा एकमताने पाठिंबा आहे. हा ऐतिहासिक संघर्ष आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या सूचनांशी आम्ही कटिबद्ध आहे.
– डी.के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कॉंग्रेसचे राज्य अध्यक्ष
Comments are closed.