ऋतुराजच्या ऐवजी मैदानात उतरला अन् ठोकल्या 159 धावा, पुनरागमनासाठी सज्ज!!

डोमेस्टिक लिस्ट ए स्पर्धा सध्या इंग्लंडमध्ये मेट्रो बँक वन डे कपचे आयोजन केले जात आहे. या स्पर्धेत पाकिस्तानी फलंदाज इमाम उल हक यॉर्कशायरकडून खेळत आहे. त्याने नॉर्थम्प्टनशायरविरुद्धच्या सामन्यात 130 चेंडूत 159 धावांची शानदार खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीद्वारे त्याने आता पाकिस्तान संघात पुनरागमनाचे दार ठोठावले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले नाही.

यॉर्कशायरने यापूर्वी ऋतुराज गायकवाडचा त्यांच्या संघात समावेश केला होता. परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने त्याचे नाव मागे घेतले. अशा परिस्थितीत, गायकवाडच्या जागी, यॉर्कशायरने चालू हंगामासाठी पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकला परदेशी खेळाडू म्हणून समाविष्ट केले. नॉर्थम्प्टनशायरपूर्वी त्याने वॉरविकशायरविरुद्ध 55 धावा केल्या होत्या. 28 वर्षीय इमाम-उल-हकने यापूर्वी 2022 मध्ये सोमरसेटकडून काउंटी क्रिकेट खेळला आहे.

इमाम-उल-हकने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याने 37.33 च्या सरासरीने 1568 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. तर 75 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 47.04 च्या सरासरीने 3152 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये नऊ शतके आणि २० अर्धशतके आहेत. त्याने या वर्षी एप्रिलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पाकिस्तान संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, परंतु या दौऱ्यासाठी इमाम उल हकला संघात स्थान मिळाले नाही.

नॉर्थम्प्टनशायर आणि यॉर्कशायर यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यॉर्कशायरने 202 धावांनी मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना यॉर्कशायरने 5 गडी गमावून 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात नॉर्थम्प्टनशायर 172 धावांवर ऑलआउट झाला. यॉर्कशायरकडून डॅन मोरियार्टी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 गडी बाद केले.

Comments are closed.