आयर्लंडच्या क्रिकेटपटूने रचला विश्वविक्रम; दुसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव

पाकिस्तान महिला संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना सिव्हिल सर्व्हिस क्लब बेलफास्ट येथे खेळला गेला, जिथे आयर्लंड संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंड महिला संघाची फलंदाज जेन मॅग्वायरने विश्वविक्रम केला आहे. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. हा सामना जिंकून आयर्लंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या टी-20 मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तान महिला संघाने 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. सलामीवीर शवाल झुल्फिकारने पाहुण्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने 27 चेंडूत 6 चौकारांसह 33 धावा केल्या. तिने यष्टीरक्षक-फलंदाज मुनिबा अली (27) सोबत पहिल्या विकेटसाठी 48 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. पण या दोन्ही फलंदाजांना बाद केल्यानंतर पाकिस्तान महिला संघाच्या उर्वरित फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार फातिमा सना आणि आयमन फातिमा या दोघीही 23-23 धावा करून बाद झाल्या. आयर्लंडकडून कारा मरे आणि लारा मॅकब्राइड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाने शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला. 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि एमी हंटर केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर, कर्णधार गॅबी लुईस (21) आणि ओर्ला प्रेंडरगास्टने डाव पुढे नेला. आयर्लंडकडून प्रेंडरगास्टने 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 51 धावा केल्या. लॉरा डेलानीने 34 चेंडूत 42 धावांची खेळी केली.

शेवटी, रेबेका स्टोक्सने 16 चेंडूत 34 धावा करून सामन्यात उत्साह निर्माण केला. जेन मॅग्वायरने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला मोठा विजय मिळवून दिला. आयर्लंडने 20 षटकात 6 गडी गमावून 171 धावा करत दुसरा टी20 सामना 4 गडी राखून जिंकला. पाकिस्तानकडून रमीन शमीमने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकणारी जेन महिला टी20 इतिहासातील पहिली खेळाडू ठरली. तिने सादिया इक्बालच्या चेंडूवर षटकार मारला.

Comments are closed.