महापारेषणच्या हायटेंशन लाइनचे भिवंडीतील 20 गावांना टेन्शन, दर निश्चितीसाठी आज प्रांत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक

गुजरात ते ठाणे जिल्ह्यातील पडघा यादरम्यान महापारेषण कंपनी हायटेंशन लाइन उभारत आहे. या लाइनने भिवंडीतील 20 गावे बाधित होणार असून तशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र किती नुकसानभरपाई मिळणार याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने ग्रामस्थ टेन्शनमध्ये आहेत. याबाबत संताप व्यक्त केल्यानंतर दर निश्चिती करण्यासाठी उद्या प्रांत कार्यालयात महापारेषन अधिकारी आणि गावकऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे.

गुजरातमधील बाभळेश्वर येथील खावडा आयव्हीसी पावर ट्रान्समिशनच्या केंद्रातून पारेषण कंपनी 400 केव्हीची हायटेंशन लाइन पडघ्याच्या विद्युत केंद्रापर्यंत आणणार आहे. यासाठी भिवंडी तालुक्यातील वीस गावांमधील शेतांमध्ये मनोरे उभारून लाइन खेचण्यात येणार आहे. याबाबत या गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा बजवण्यात आल्या आहेत. याबाबत दर निश्चिती करण्यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या दालनात बाधित शेतकऱ्यांची 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

या गावांना फटका
भिवंडी तालुक्यातील मौजे रवदी, आंबाडी, दिघाशी, दलोंडे, चाणे, खारिवली, जांभिवलीतर्फे खंबाळे, किरवली दुरवली, लाप बु., खालिंग बु., दलेपाडा, चिंचवलीतर्फे राहुर, देवळी, भोकरी, डोहळे, पडघा, आन्हे, वांद्रे व भादाणे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. दरम्यान अपेक्षित दर न देता दांडगाई करून लाइन उभारण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी दर निश्चिती करून काम सुरू करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

Comments are closed.